वरुडात महावितरण कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST2021-03-18T04:14:08+5:302021-03-18T04:14:08+5:30
वीज बिल वसुलीला विरोध, उपकार्यकारी अभियंत्यांची पोलीस ठाण्यात तक्रार, मनसे तालुकाप्रमुखासह सात कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हे वरूड : शहरातील महावितरणच्या शेंदूरजनाघाट ...

वरुडात महावितरण कार्यालयाची तोडफोड
वीज बिल वसुलीला विरोध, उपकार्यकारी अभियंत्यांची पोलीस ठाण्यात तक्रार, मनसे तालुकाप्रमुखासह सात कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हे
वरूड : शहरातील महावितरणच्या शेंदूरजनाघाट उपकार्यकारी अभियंता कार्यालयात सक्तीची वीज बिल वसुली, वीजपुरवठा तोडण्याच्या विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली तसेच खंडित वीजपुरवठा जोडून देण्याची मागणी करीत कार्यालयातील संगणकासह खुर्च्यांची तोडफोड केली. काचा फोडल्या. यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता विनोद काळे यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी मनसे तालुकाप्रमुखासह सात लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. सबॉर्डिनेट इंजिनीअर असोसिएशनने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, ठाणेदारांनी आरोपीला तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलीस सूत्रांनुसार, बुधवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास वरूड येथील महावितरण कंपनीच्या शेंदूरजनाघाट उपविभाग कार्यालयात मनसे तालुकाध्यक्ष रोशन लोखंडेंसह पाच ते सात कार्यकर्ते गेले होते. सक्तीची वसुली बंद करून खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करून द्या, अशी मागणी त्यांनी केली. उपकार्यकारी अभियंता विनोद काळे यांनी वीज बिल भरल्याशिवाय पुरवठा जोडता येणार नाही, असे सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांंसह उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्कण्करण्यात आली. बाहेरून लाकडी दांडे आणून मनसे तालुकाध्यक्षासह कार्यकर्त्यांनी संगणक, टेबलवरील काच, खुर्च्या, सीसीटीव्ही स्क्रीनची तोडफोड केली. एक लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची तक्रार याप्रकरणी करण्यात आली.
उपकार्यकारी अभियंता विनोद काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रोशन लोखंडे, प्रज्वल मानकर अधिक पाच अनोळखी इसम अशा सात जणांविरुद्ध भादंविचे कलम ३५३, १४३, १४७, १४९, ४२७ आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ अन्वये गुन्हे दाखल केला.
आरोपींच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. ठाणेदार प्रदीप चौगावकार यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पुढील तपास करीत आहेत.