भगवान शंकराच्या मूर्तीची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:34+5:302021-03-13T04:23:34+5:30
मोर्शी येथील घटना : अज्ञाताविरुद्ध गुन्हा मोर्शी : येथील हिंदू स्मशानभूमीतील भगवान शंकराच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. ११ मार्च ...

भगवान शंकराच्या मूर्तीची तोडफोड
मोर्शी येथील घटना : अज्ञाताविरुद्ध गुन्हा
मोर्शी : येथील हिंदू स्मशानभूमीतील भगवान शंकराच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. ११ मार्च रोजी सकाळी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. महाशिवरात्रीदिनी भोले शंकराच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याने मोर्शी शहरात संतापाची लाट उसळली. परिणामी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चांदूर बाजार मार्गावर ‘हरे राम हरे कृष्ण’ स्मशानभूमी असून, या ठिकाणी सन २०१५ मध्ये सामाजिक कार्यकर्ते नीलेश रोडे, मूर्तिकार विजय ढोले व व्यापारी वर्गाच्या सहकार्यातून पालिकेचे विद्यमान उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांच्यातर्फे संत ज्ञानेश्वर, विजय ढोलेतर्फे भोले शंकराची मूर्ती व माजी नगरसेवक अजय आगरकरतर्फे स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वीदेखील यातील एका मूर्तीची विटंबना करण्यात आली होती.
दरम्यान, गुरुवारी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मूर्तिकार विजय ढोले हे भोले शंकराच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी गेले असता, त्या मूर्तीची विटंबना झाल्याचे निदर्शनास आले. या गंभीर प्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्ते भूषण कोकाटे व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संघटक अतुल शेळके यांनी मोर्शी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ स्मशानभूमी गाठत घटनेची नोंद घेतली तसेच अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम २९५ अन्वये गुन्हा नोंदविला.
बाहेरच्या पानासाठी