कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामात शेतकऱ्याच्या पाईप लाईनची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:44+5:302021-06-01T04:10:44+5:30
फोटो पी ३१ सातनूर वरूड : सातनूर शिवारात देवना नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामात संत्र्याला पाणी देण्याकरिता टाकलेली पीव्हीसी पाईप ...

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामात शेतकऱ्याच्या पाईप लाईनची तोडफोड
फोटो पी ३१ सातनूर
वरूड : सातनूर शिवारात देवना नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामात संत्र्याला पाणी देण्याकरिता टाकलेली पीव्हीसी पाईप लाईन कंत्राटदाराच्या पोकलेनने फोडली. याबाबत शेतकऱ्याला सुपरवायझरने, जे होते ते करून घ्या, असा दम भरला. शेंदूरजनाघाट पोलिसांनी सुपरवायझरविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दुसरीकडे संत्र्याला पाणी न मिळाल्याने आंबिया बहराची लाखोंची संत्री गळाली.
पंकज गुलाबराव चौधरी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, देवना नदीवर जिल्हापरिषद सिंचन विभागाकडून कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम सुरू आहे . याच शिवारात पंकज चौधरी यांचे शेत आहे. त्यांनी २०१८-१९ मध्ये मौजा मलकापूर येथून संत्र्यासह झाडाचे ओलीत करण्यासाठी पीव्हीसी पाईप लाईन टाकली होती. देवना नदीवर पाणी अडविण्याकरिता बंधाऱ्याचे काम होत असताना चौधरी यांनी ती पाईप लाईन काढून नदीकाठाने लांबवर टाकली. परंतु, जेसीबी व पोकलेनच्या कामात ती पाईप लाईन फुटली. काही फुटलेले पाईप चोरीला गेले. याबाबत कंत्राटदाराच्या सुपरवायझरला सांगितले असता, त्यानेच दम भरला. पाईप फुटल्याने शेतकऱ्याचे साडेपाच हज़ार रुपयांचे नुकसान झाले असले तरी पुढे पाण्याअभावी आंबिया बहार गळाल्याने लाखोंचे नुकसान झाले.
याबाबत शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ४२७ अन्वये अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली. जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून चौकशी होईपर्यंत या कामाची देयके देऊ नये, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पंकज चौधरी यांनी केली आहे.