राजकारणात स्वच्छ व्यक्ती हाच लोकशाहीचा सन्मान
By Admin | Updated: January 24, 2015 22:47 IST2015-01-24T22:47:07+5:302015-01-24T22:47:07+5:30
देशासमोर युवकांची बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न ही मोठी समस्या उभी आहे. भष्ट्राचार या व्यवस्थेपासून सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींनी राजकारणात येणे

राजकारणात स्वच्छ व्यक्ती हाच लोकशाहीचा सन्मान
अमरावती : देशासमोर युवकांची बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न ही मोठी समस्या उभी आहे. भष्ट्राचार या व्यवस्थेपासून सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींनी राजकारणात येणे हाच खरा लोकशाहीचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन केंद्रिय रासायनिक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी येथे शनिवारी व्यक्त केले.
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित अभियांत्रीकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ‘तरंग’ तांत्रिकी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, आ. सुनील देशमुख, शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे, उद्योजक चित्तरंजन काजवडकर, माणिक ठोसरे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, प्राचार्य ए, बी. मराठे, सुरेश सावदेकर, श्रीकांत चेंडके, सुनील खराटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. अहिर यांनी हव्याप्र मंडळाचा गौरव करीत या संस्थेने खेडाळू घडविताना देशाला निरोगी युवक देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. येथील खेडाळू मोठ्या पदावर कार्यरत असून निरोगी देशभक्त घडविले आहेत. प्राचीन काळातही ऋषी, मुनी आणि गुरुदक्षिणा हा शिष्य, गुरुंची महिमा विषद करणारा ठरला. हीच परंपरा हव्याप्र मंडळाने जोपासली असून ती देशभक्तीसाठी पूरक असल्याचे ते म्हणाले. शिक्षण देणाऱ्या संस्थानाही विद्यार्थ्यांचे पुढे काय? ही चिंता कायम आहे. त्यामुळे येत्या काळात बेरोजगारी दूर करणारी तांत्रिक शिक्षण, नवीन धोरण सुरु करावे लागेल. सरकारपेक्षा संस्था शिक्षणासाठी मोठे काम करतात. रोजगार नसतानाही शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरुच आहे. त्यामुळे प्रगत तंत्रज्ञान, कुशल युवक कसा तयार होईल, याकडे भर दिला जाईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ हे स्वप्न बघितले आहे. त्याकरिता ग्रामीण युवक, शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट हे अभिनव उपक्रम राबविले जाणार आहे. बेरोजगारी सर्वच जाती धर्मात असून ती दूर करण्यासाठी नव्याने धोरण तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात काही चांगले करायचे असेल तर राजकारणात चांगल्या प्रतिमेच्या व्यक्ती आल्या पाहिजे, असे म्हणताना ना. अहिर यांनी इस्त्रोचे शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे यांना राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले.
यावेळी रामदास तडस, सुनील देशमुख, नितीन घाटपांडे, प्रभाकराव वैद्य आदींनी मनोगत व्यक्त केले. लोकप्रतिनिधी, खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. संचालन मराठे तर आभार प्रदर्शन माधुरी चेंडके यांनी केले. (प्रतिनिधी)