लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती ते मुंबई या हवाई मार्गावर अलायन्स एअरकडून चालविण्यात येणाऱ्या विमानसेवेची भाडेवाढ कमी करून प्रवाशांच्या मागणीनुसार वेळत बदल करावा, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे. अमरावती-मुंबई विमानप्रवास सेवेच्या भाड्यांमध्ये अलीकडील काळात झालेल्या दरवाढीमुळे प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
ही विमानसेवा सामान्य प्रवाशांसाठी सुलभ आणि परवडणारी राहावी, यासाठी खासदार बळवंत वानखडे यांनी पुढाकार घेतला आहे. अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शहर असून येथे औद्योगिक, शैक्षणिक आणि प्रशासनिक कामकाजासाठी मुंबईत सतत प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत विमानसेवेच्या भाड्यांमध्ये झालेली अनावश्यक वाढ ही सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे तातडीने भाडेवाढीचा फेरविचार करून ती पूर्ववत करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, सद्यःस्थितीत अमरावती मुंबई विमान प्रवासाचा वेळ दुपारी असल्यामुळे अनेक व्यावसायिक आणि कर्मचारी वर्गाला त्याचा फारसा उपयोग गळ होत नाही.
अमरावतीहून मुंबईकडे जाण्याची वेळ सकाळी आणि मुंबईवरून परत येण्याची वेळ संध्याकाळी ठेवण्यात यावी, जेणेकरून अमरावतीकर एका दिवसात आपले काम आटपून परत येऊ शकतील, अशीही विनंती खासदार बळवंत वानखडे यांनी मंत्र्यांकडे केली आहे. नागरी उड्डाण मंत्री यांनी खा. वानखडे यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. संबंधितांकडून तातडीने अहवाल मागवण्यात येईल आणि प्रवाशांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन ना. राम मोहन नायडू यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.