खुल्या संवर्गाला आरक्षणाची मागणी
By Admin | Updated: September 4, 2015 00:31 IST2015-09-04T00:31:26+5:302015-09-04T00:31:26+5:30
गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करुन अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेले हार्दिक पटेल हे देशभरात आरक्षणाचे आॅयकॉन ठरु लागले आहेत.

खुल्या संवर्गाला आरक्षणाची मागणी
पत्रपरिषद: शासन, प्रशासन स्तरावर लढा उभारण्यासाठी मंच स्थापन
अमरावती: गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करुन अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेले हार्दिक पटेल हे देशभरात आरक्षणाचे आॅयकॉन ठरु लागले आहेत. अशातच खुल्या संवर्गांला सुद्धा आरक्षण मिळावे, अशी मागणी मुन्ना राठोड यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली.
राठोड यांच्या मते, आमचा कोणत्याही जाती, धर्माच्या आरक्षणाला विरोध नाही. परंतु खुल्या सवर्गांतील युवक हताश झाले आहे. शैक्षणिक, सामाजिक, नोकरी, राजकीय दृष्ट्या कोणतेही खुल्या संवर्गांना संरक्षण मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हार्दिक पटेल यांनी आरक्षणाची मागणी रेटून धरली म्हणून खुल्या संवर्गातील ४६ टक्के जाती, धर्माच्या लोकांना आरक्षण मिळावे, यासाठी लढा उभारल्या जात नाही. मात्र येत्या काळात खुल्या संवर्गांतील धर्मियांना सर्वच क्षेत्रात संरक्षण मिळावे, यासाठी एक मंच स्थापन केला जाणार आहे. देशात ५४ टक्के आरक्षण हे राखीव संवर्गाना देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित ४६ टक्के आरक्षण हे खुल्या संवर्गातील जाती, धर्मांना मिळावे, यासाठी खुले संवर्ग विकास मंच या नावाने संघटना स्थापन केली जाणार आहे.
या मंचच्या माध्यमातून खुल्या संवर्गामध्ये आरक्षणाविषयी जनजागृती केली जाईल, असे राठोड यांनी सांगितले. खुल्या संवर्गासाठी आरक्षणाची लढाई ही सर्वसमावेश निर्माण करता यावी, यासाठी स्वतंत्र मंच स्थापन करण्यात येणार आहे. आरक्षण हे जातीच्या आधारावर नव्हे तर आर्थिक निकषावर मिळावे, अशी मागणी देखील पुढे रेटणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला संतोष झंवर, नगरसेवक हमीद शद्दा, तनवीर आलम, प्रा. भट, प्रा. चौधरी, मो. हारुण, तिवारी, प्रा. कावेकर, रश्मी नावंदर, अॅड. सादीक आदी उपस्थित होते. या मुद्यावर पत्रपरिषदेत चर्चा झाली.