महिलेची आॅटोरिक्षातच प्रसूती
By Admin | Updated: July 14, 2015 01:02 IST2015-07-14T01:02:19+5:302015-07-14T01:02:19+5:30
प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेला येथील मोदी रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा स्त्री रूग्णालयात पाठविण्यात

महिलेची आॅटोरिक्षातच प्रसूती
बडनेरा : प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेला येथील मोदी रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा स्त्री रूग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, प्रसूतीची वेळ जवळ आल्याने ही महिला आॅटोरिक्षातच प्रसूत झाली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मोदी दवाखान्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महानगरपालिकेचे बडनेऱ्यात ‘मोदी’ नावाचे इस्पितळ आहे. या दवाखान्यात प्रसूतीची व्यवस्था आहे. मात्र, डॉक्टर किंवा परिचारिका उपलब्ध राहात नसल्यामुळे अनेकदा प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना अमरावतीच्या जिल्हा स्त्री रूग्णालयात पाठविले जाते.
सोमवार, १३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नव्या वस्तीतील मोमीनपुऱ्यात राहणाऱ्या शबाना नामक महिलेला प्रसूतीसाठी मोदी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टर किंवा परिचारिका उपलब्ध नसल्यामुळे दवाखान्यातील सफाई कर्मचाऱ्याने महिलेला डफरीन रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
आॅटोत बसवून घाईगडबडीने तिला अमरावतीच्या डफरीन दवाखान्यात नेत असतानाच अमरावती मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळ आॅटोरिक्षातच महिलची प्रसूती झाली. प्रसूत झाल्यानंतर तिला वाटेतच धन्वंतरी रूग्णालयात दाखल करून बाळाची नाळ कापण्यात आली. मोदी रूग्णालयातील या गलथान कारभारामुळे संताप व्यक्त होत आहे.
गोरगरीब रूग्णांचे होताहेत हाल
४बडनेऱ्यासह जवळपासच्या ५० खेड्यांमधील महिली प्रसूतीसाठी मोदी रूग्णालयात येत असतात. गोरगरिबांच्या सोयीसाठीच मोदी दवाखान्यात प्रसूतीची व्यवस्था प्रशासनाने करून दिली आहे. मात्र, शेकडो महिलांना प्रसूतीविनाच येथून परत जावे लागत आहे. मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवारांनी या गंभीर बाबींची दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ही समस्या सोडवावी.