वेतन देयकांना विलंब; पाच कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: January 1, 2017 00:42 IST2017-01-01T00:42:09+5:302017-01-01T00:42:09+5:30
शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत शिक्षकांचे नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे वेतन देयके विलंबाने सादर ..

वेतन देयकांना विलंब; पाच कर्मचारी निलंबित
सीईओंची कारवाई : वेतन देयके उशिरा सादर करणे भोवले
अमरावती : शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत शिक्षकांचे नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे वेतन देयके विलंबाने सादर केल्याप्रकरणी मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दर्यापूर व चांदूररेल्वे पंचायत समिती मधील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ सहायकांचा समावेश आहे. यासंदर्भात शुक्रवार ३० डिसेंबर रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये दर्यापूर पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक राहुल प्राणकर, वरिष्ठ सहायक पी.एस. साखरे, वरिष्ठ सहायक व्ही. बी. देशमुख, तर चांदूररेल्वे पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अनिल राऊत व कनिष्ठ सहायक अरविंद चिंचमलातपूरे यांचा समावेश आहे. सीईओंच्या या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.
शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत पंचायत समिती स्तरावरून दर महिन्याच्या १४ तारखेपर्यंत वेतन देयके सादर करण्याबाबत सीईओंनी सर्व पंचायत समितींना लेखी सूचना दिल्या आहेत. यानुसार प्रत्येक पंचायत समितीचा आढावा प्रशासन प्रमुखांकडून घेण्यात येतो. जिल्ह्यातील १४ पंचायत समितींपैकी १२ पंचायत समितींनी शालार्थ प्रणालीनुसार माहे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन देयके एमटीआर ४४-बीडीएस २६ नोव्हेंबर रोजी काढल्याने वित्त विभागाला ते २८ नोव्हेंबरला प्राप्त झाले. त्यानुसार वित्त विभागाने सीईओंकडे वेतन देयके सादर केलीत.