एसटी वाहकाकडून प्रवाशांची अवहेलना
By Admin | Updated: September 21, 2015 00:01 IST2015-09-21T00:01:18+5:302015-09-21T00:01:18+5:30
अमरावतीहून चिखलदरा-यवतमाळ बस क्रमांक एमएच ४० वाय ५५६२ या बसमध्ये चढलेल्या प्रवासी महिलेला नांदगाव खंडेश्वर येथे उतरविण्याचा प्रयत्न केल्याने ...

एसटी वाहकाकडून प्रवाशांची अवहेलना
शिवणी रसुलापूर : अमरावतीहून चिखलदरा-यवतमाळ बस क्रमांक एमएच ४० वाय ५५६२ या बसमध्ये चढलेल्या प्रवासी महिलेला नांदगाव खंडेश्वर येथे उतरविण्याचा प्रयत्न केल्याने शिवणी बस थांब्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जलद बसेसना थांबा असूनही वाहकांच्या मनमानी कारभारामुळे बसेस थांबत नसल्याने गेल्या १६ सप्टेंबर रोजी शिवणी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही जलद बसेस थांबत नसल्याने संतप्त नागरिकांनी पुन्हा रविवारी रस्त्यावर येऊन ठिय्या दिला.
शिवणी रसुलापूर येथे येणाऱ्या मुक्ता उमेश बनसोड या महिलेने सदर बसच्या वाहकाला शिवणीचे तिकीट मागितले असता त्याने शिवणीला बस थांबत नसल्याचे सांगितले व नांदगाव खंडेश्वरचे तिकीट दिले. सदर महिलेने याबाबत माहिती घेतल्यानंतर वाहकाकडे शिवणीचे तिकीट मागितले. नांदगाव खंडेश्वर येथे बस पोहोचल्यानंतर त्याने नांदगाव खंडेश्वर ते शिवणी असे तिकीट दिले. सदर महिलेने ही माहिती नातेवाईकाला दिली. ही बस थांब्यापासून दूर उभी करण्यात आली होती. त्यामुळे थांब्यावरील संतप्त प्रवाशांनी बस अडविली.
थांब्यावरील प्रवासी व नागरिकांनी नेर आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केले व लेखी तक्रार दिली.
१६ सप्टेंबर रोजी अशाच प्रकरणी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर येथे पूर्ण वेळ वाहतूक नियंत्रक देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही काही जलद बसेस येथे थांबत नाहीत. एसटीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर असतानाही काही बसेस थांबत नव्हत्या. त्यामुळे प्रवासी हतबल झाले होते. बस थांबावी यासाठी उमेश बनसोड, ज्ञानेश्वर कळंबे, माधव ढोके, धीरज बनकर, मोरेश्वर वंजारी व गावकऱ्यांनी रविवारी सदर बस रोखून मन:स्ताप व्यक्त केला. याची दखल घेत नेर आगाराचे व्यवस्थापक व अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली.