११ तालुक्यांत भूजल पातळीत घट
By Admin | Updated: February 10, 2016 00:08 IST2016-02-10T00:08:11+5:302016-02-10T00:08:11+5:30
सन २०१५ च्या जून ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस होऊनही भूजल पातळी घटण्याचा वेग यंदाही कायम आहे.

११ तालुक्यांत भूजल पातळीत घट
अमरावती : सन २०१५ च्या जून ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस होऊनही भूजल पातळी घटण्याचा वेग यंदाही कायम आहे. अंजनगाव तालुक्यात सर्वाधिक १.६९ मीटरची घट नोंदविण्यात आली.
जानेवारी अखेर भूजल सर्वेक्षण विभागामार्फत नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील जमिनीतील पाण्याच्या पातळीत सरासरी ०.७८ मीटरने घट झाल्याचे स्पष्ट होते. ११ तालुक्यात भूगर्भातील जलपातळी घटली असून धामणगाव रेल्वे आणि तिवसा तालुक्यात किंचितशी वाढ नोंदविण्यात आली आहे. जिल्हा भूजल व सर्वेक्षण यंत्रणेद्वारे सरासरी पर्जन्यमान, पर्जन्यमानातील फरक, निरीक्षण, विहिरीवरून भूजलपातळीत झालेल्या फरकांचे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाच्या अभ्यासानुसार जिल्ह्यातील भूगर्भात असलेल्या जलपातळीत घट झाली आहे. (प्रतिनिधी)
१४८ विहिरींच्या निरीक्षणांतीचा निष्कर्ष
जानेवारी २०१६ अखेर ११ तालुक्यातील भूगर्भ जलपातळी मध्ये ०.७८ मीटरने सरासरी घट आढळून आली. जिल्ह्यातील १४८ विहिरींतील पाण्याची पातळी वर्षातून चारदा मोजली जाते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१५ दरम्यान सरासरी ९२ टक्के पर्जन्यमान झाले. त्यापार्श्वभूमीवर भूगर्भातील जलपातळीत नोंदविलेली घट पाहता उपसा नियंत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्याची परिस्थिती
महाराष्ट्रातील भूजल व विकास अनुसंघाने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१५ मध्ये राज्यभरातील विविध तालुक्यांत सरासरी पर्जन्यमानात २५ ते ५० टक्के घट झाली. परिणामी भूजल पातळी एक ते तीन मीटरने खाली गेली. राज्यात ३५५ तालुक्यांपैकी १ ७६ तालुक्यांत २ मीटरपर्यंत व ११२ तालुक्यात भूजल पातळीतील घट तीन मीटरपेक्षा अधिक आहे. यामुळे तीव्र पाणी टंचाई भासत आहे.