अनधिकृत शाळा बंद करण्याचा निर्णय
By Admin | Updated: May 25, 2016 00:28 IST2016-05-25T00:28:11+5:302016-05-25T00:28:11+5:30
शहर व जिल्ह्यात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या आठ शाळा त्वरीत बंद करण्याचा ठराव मंगळवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीने घेतला आहे.

अनधिकृत शाळा बंद करण्याचा निर्णय
जिल्हा परिषद : शिक्षण सभापतींचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश
अमरावती : शहर व जिल्ह्यात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या आठ शाळा त्वरीत बंद करण्याचा ठराव मंगळवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीने घेतला आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण सभापती गिरीश कराळे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे यांना दिले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाची मान्यता न घेताच शहरात अनधिकृ तरित्या सुरू असलेल्या पाच आणि ग्रामीण भागातील तीन अशा ८ शाळा तातडीने बंद करण्यात याव्यात, असा ठराव शिक्षण समिती सदस्य चंद्रपाल तुरकाने यांनी सभेत मांडला. याला सभापती गिरीश कराळे यांनी अनुमोदन दिले. बंद करण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांमध्ये नारायण इंग्लिश स्कूल गोपालनगर, स्टार इंग्लिश स्कूल वलगाव रोड, बोथरा इंग्लिश स्कूल प्रवीणनगर, बुध्दिस्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, तिवसा, सेंट जेम्स प्राथमिक शाळा मोर्शी, एसडीएफ इंग्लिश स्कूल, गणेडीवाल ले- आऊट, ब्लॉसम इंग्लिश स्कूल राजापेठ आणि आयडियल इंग्लिश स्कूल, तिवसा या शाळांचा समावेश आहे.
गणवेश बदलाचा प्रस्ताव
अमरावती : जि.प. शिक्षण समितीची सभा २४ मे रोजी दुपारी १ वाजता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात बोलविण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती गिरीश कराळे होते. सभेत जि प शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा एकच रंग करण्याबाबतचा ठराव कराळे यांनी मांडला. याला समिती सदस्यांनी एकमताने सहमती दिली. हा ठराव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी शासनाकडून मोफत पाठपुस्तके पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचा मुद्दा सदस्य मनोहर सुने यांनी मांडला. यावर शिक्षणाधिकारी पानझाङे यांनी नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. सभेला सभापती गिरीश कराळे, सदस्य मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने, मोहन पाटील, बापूराव गायकवाड, शिक्षणाधिकारी पानझाडे, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत उपस्थित होते.(प्रतिनिधी)