दोन ट्रकची राखरांगोळी, भाजल्याने एकाचा मृत्यू
By Admin | Updated: January 1, 2017 00:42 IST2017-01-01T00:42:56+5:302017-01-01T00:42:56+5:30
लोणीनजीकच्या महामार्गावर शुक्रवारी रात्री दोन ट्रकची आगीने राखरांगोळी झाली, तर एकाचा जळून मृत्यू झाला.

दोन ट्रकची राखरांगोळी, भाजल्याने एकाचा मृत्यू
लोणीतील घटना : महामार्गावरील वाहतूक पाच तास खोळंबली
बडनेरा : लोणीनजीकच्या महामार्गावर शुक्रवारी रात्री दोन ट्रकची आगीने राखरांगोळी झाली, तर एकाचा जळून मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्य महामार्गावरची वाहतूक पाच तास खोळंबळी होती.
शुक्रवारी रात्री रासायनिक पदार्थ वाहून नेणाऱ्या व लोखंडाची टिनपत्रे वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर अपघात झाला. अपघातानंतर केमिकलने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याने दोन्ही ट्रक आगीच्या विळख्यात सापडले. आगीचे मोठमोठे लोळ उठल्याने नजीकच्या लोकवस्तीतील नागरिक धास्तावले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचे तब्बल दहा पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीचे भयावह दृश्य पाहून गावकरी धास्तावले होते. या आगीच्या विळख्यात केमिकल पदार्थ वाहून नेणारा ट्रक चालक अडकला आणि त्याचा जळून मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली. ट्रकमध्ये केवळ चालकाला सांगडाच पोलिसांना आढळून आला आहे. मात्र, तो ट्रक कुठून आला व कुठे जात होता, याबाबतची चौकशी पोलीस करीत आहेत.
घटनास्थळाला तहसीलदार व्ही.बी. वाहुरवाघ, डीवायएसपी पालवे, सहायक पोलीस निरीक्षक डी.एच. ब्राम्हणे, उपनिरीक्षक बावणकर, अनिल धोटे, प्रकाश किल्लेदार, संजय मांजेकर, तातेडे, गजानन डवरे, बाळासाहेब भागवत, मनोज मुंदाने, पवन पानझडे, जितेंद्र शिंदे, मोंढे, तलाठी मिल्ले यांच्यासह अन्य अधिकारी रात्रभर तैनात होते. (शहर प्रतिनिधी)