‘त्या’ अग्निदग्धेचा अखेर मृत्यू !
By Admin | Updated: March 12, 2015 00:49 IST2015-03-12T00:49:12+5:302015-03-12T00:49:12+5:30
सासरच्या मंडळींकडून सातत्याने हुंड्यासाठी होणारा छळ आणि चारित्र्यावर संशय घेतल्याने आलेल्या मानसिक नैराश्याने ग्रासलेल्या विवाहितेने २३ फेब्रुवारी स्वत:ला पेटवून घेतले होते.

‘त्या’ अग्निदग्धेचा अखेर मृत्यू !
बेलोरा : सासरच्या मंडळींकडून सातत्याने हुंड्यासाठी होणारा छळ आणि चारित्र्यावर संशय घेतल्याने आलेल्या मानसिक नैराश्याने ग्रासलेल्या विवाहितेने २३ फेब्रुवारी स्वत:ला पेटवून घेतले होते. त्या अग्निदग्धेचा उपचारादरम्यान मंगळावारी मृत्यू झाला. तिच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरलेल्या पतीसह सासरच्यामंडळींना अटक होत नाही, तोवर अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, अशी भूमिका विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलिसांनी पतीला अटक केल्यानंतर प्रकरण निवळले.
जळगाव आर्वी येथील रहिवासी प्रमिला सुधाकर डोईफोडे यांची मुलगी पुनमचा विवाह ४ जून १९९३ साली शिरजगाव बंड येथील गिरीश कुरळकर याच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. काही दिवस दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, काही वर्षांनी पुनमचा शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. माहेरून पैसे आणण्याचा तगादा तिच्यामागे सासरची मंडळी लाऊ लागली. तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रकार देखील वाढला होता, असे मृत पुनमची आई प्रमिला डोईफोडे यांचे म्हणणे आहे. यामध्ये पती गिरीशसह संतोष कुरळकर व मनोरमा कुरळकर यांचाही हातभार होता. या त्रासाला कंटाळून २३ फेब्रुवारी रोजी पुनमने स्वत:ला पेटवून घेतले. गंभीर अवस्थेत तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.