विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, एक भाजला
By Admin | Updated: December 15, 2015 00:10 IST2015-12-15T00:10:05+5:302015-12-15T00:10:05+5:30
शाळेच्या मधल्या सुटीत शाळेमागील शेतातील बोरे तोडायला गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, एक भाजला
घटना : शाळेच्या सुटीत बोरे तोडणे जीवावर बेतले
परतवाडा : शाळेच्या मधल्या सुटीत शाळेमागील शेतातील बोरे तोडायला गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान नजीकच्या शिंदी बु येथे घडली.
हृषीकेश रवींद्र हागोणे (१४,रा. शिंदी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे तर हृषीकेश कैलाश दमाहे (१४,रा. शिंदी. बु) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याचा हात भाजला आहे. त्याच्यावर पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार सुरू आहेत. दोघेही शिंदीच्या दिगंबर पेठकर विद्यालयाचे विद्यार्थी होते. वर्गमित्र असल्याने सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुटीत ते दोघेही शाळेमागील बोरी झाडावर बोरे तोडायला गेले होते.
बोराच्या झाडाला लागूनच विद्युत तारा गेल्या आहेत. त्यांचा स्पर्श फांद्यांना झाल्याने झाडामध्ये विद्युत प्रवाह संचारला होता. हृषीकेश हागोणे झाडावर चढून बोरे तोडत असताना त्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो झाडाखाली फेकला गेला. जमिनीवर पडल्याने त्याच्या डोक्याला दगडाचा मार बसला. त्याला तत्काळ परतवाडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. हृषीकेश दमाहे याचा हात भाजल्याने त्याच्यावर पथ्रोट येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. (प्रतिनिधी)