खासगी डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बहीण-भावाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:50+5:302021-09-19T04:13:50+5:30
दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल... पान २ लीड सर्पदंशाचे प्रकरण, दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल दर्यापूर : येथील एकता हॉस्पिटलचे ...

खासगी डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बहीण-भावाचा मृत्यू
दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल...
पान २ लीड
सर्पदंशाचे प्रकरण, दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल
दर्यापूर : येथील एकता हॉस्पिटलचे डॉ. पठाण यांच्या निष्काळजीपणामुळे बहीण-भावाचा मृत्यू झाला असल्याची तक्रार या दोघांचे वडील बाळू हरिसिंह चव्हाण (रा. दाढी क्वार्टर, ता. भातकुली) यांनी बुधवारी दर्यापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी ही तक्रार तूर्तास चौकशीत ठेवली आहे.
वडील बाळू चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे २ सप्टेंबर रोजी मावशीच्या घरी पाहुणे म्हणून आलेले मृत पवन बाळू चव्हाण (१९) व मुलगी स्वाती बाळू चव्हाण (१३) यांना ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री गाढ झोपेत असताना घरात शिरलेल्या सापाने चावा घेतला होता. यानंतर मुलांच्या पोटात दुखत असल्याचे निदर्शनास येताच दोन्ही मुलांना रात्री १ वाजता दरम्यान दर्यापूर येथील एकता हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी समयसूचकता दाखविली नाही. वेळकाढू धोरण अवलंबून मुलांना फक्त प्रथम उपचार करून अप्रशिक्षित कक्षसेवकांच्या जबाबदारीवर सोपवून डॉक्टर निघून गेले.
डॉ. पठाण यांनी कोणत्याही प्रकारचा उपचार केला नाही. मात्र, तुम्ही अशिक्षित आहात. तुम्हाला काहीही समजत नाही. दवाखान्यात रात्री चे भाडे लवकरात लवकर जमा करा आणि तुमच्या पेशंटला घेऊन जा, असे सांगून तेथून सर्वांना काढून दिले. दोन्ही मुलांचा हॉस्पिटलच्या बाहेर पडताच मृत्यू झाला. या मृत्यूस त्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे वडील बाळू चव्हाण यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
---------------
तक्रार प्राप्त झाली आहे. ती चौकशीत ठेवण्यात आली आहे. डॉक्टरकडून कोणता उपचार करण्यात आला, याची माहिती मागवण्यात आली आहे. माहिती पुढील तपासाकरिता जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवण्यात येईल.
- प्रमेश आत्राम, पोलीस निरीक्षक, दर्यापूर
----------
कोट :
माझ्याकडे पेशंट आल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले व त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले. माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत त्यात काही तथ्य नाही.
- डॉ. पठाण, दर्यापूर
180921\img-20210918-wa0004.jpg
खाजगी डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बहिण-भावाचा मृत्यू..
दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल...