कर्तव्यावरच पोलीस शिपायाचा मृत्यू
By Admin | Updated: October 27, 2015 00:17 IST2015-10-27T00:17:18+5:302015-10-27T00:17:18+5:30
दुर्गोत्सवाच्या बंदोबस्तासाठी शिरखेड ठाण्यात आलेल्या जिल्हा मुख्यालयातील एका शिपायाचे रविवारी सकाळी कर्तव्यावर असताना निधन झाले.

कर्तव्यावरच पोलीस शिपायाचा मृत्यू
शिरखेड येथील घटना : दुर्गोत्सवाच्या बंदोबस्तासाठी होता तैनात
मोर्शी : दुर्गोत्सवाच्या बंदोबस्तासाठी शिरखेड ठाण्यात आलेल्या जिल्हा मुख्यालयातील एका शिपायाचे रविवारी सकाळी कर्तव्यावर असताना निधन झाले. किशोर पंधराम (४५, कडाव, ता. धारणी) असे मृत पोलिसाचे नाव आहे.
दुर्गोत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना शिरखेड ठाण्यात पाचारण करण्यात आले होते. त्यात किशोर पंधराम, ब.नं.३८९ यांचासुध्दा समावेश होता. कर्तव्यावार असताना रविवारी सकाळी ते झोपेतून उठले नाहीत. हे पाहून इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे नेरपिंगळाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांना ठाणेदार नितीन चव्हाण यांनी ठाण्यात पाचारण केले. त्यांनी तपासणी करुन किशोर पंधराम यांना मृत घोषित केले.
ठाणेदार नितीन चव्हाण यांनी घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्यासह पोलीस मुख्यालय आणि मृताच्या नातेवाईकांना दिली. मृत किशोर यांच्या पत्नी मोर्शी तालुक्यातील काटपूर धामणगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या तातडीने शिरखेड ठाण्यात पोहोचल्या. त्यांचे अन्य नातेवाईकसुध्दा शिरखेड ठाण्यात दाखल झाले. मृताचा पंचनामा केल्यानंतर किशोर पंधराम यांचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
अति ताणाचे बळी
पोलिसांवर नियमित कर्तव्यासोबतच वेगवेगळ्या बंदोबस्ताचा अती ताण पडतो. त्यांच्या हक्काच्या रजेचासुध्दा त्यांना उपभोग घेता येत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने आजारी पडतात. कर्तव्य बजावताना प्रकृतीकडे त्यांचे दुर्लक्ष होते. रजा मिळत नाहीत. याबद्दलची चीड या घटनेनंतर व्यक्त होताना दिसली.
गृहमंत्र्यांची शिरखेड भेट मात्र घटनेपासून अनभिज्ञ
गृहमंत्री रणजीत पाटील हे शनिवारी वरुड येथे मुक्कामी होते. रविवारी अमरावतीला परतत असताना त्यांनी तिवस्याचे माजी आमदार साहेबराव तट्टे यांच्या शिरखेड येथील निवासस्थानी सकाळी भेट घेतली. तत्पूर्वी किशोर पंधराम यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव पोलीस ठाण्यात होते. मात्र, तोपर्यंत त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली नव्हती. त्यांचा शिरखेड दौरा आटोपल्यावर मात्र त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ना. रणजित पाटील यांनी माजी आमदार तट्टे यांना मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याची जबाबदारी सोपविली.
मोर्शी पोलिसांनी वाहिली श्रध्दांजली
कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवाच्या निधनामुळे मोर्शी येथील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. येथील ठाणेदार सुधीर पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृत किशोर पंधराम यांना पुष्पचक्र अर्पण केले.
दुर्गोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात आलेले किशोर पंधराम हे पोलीस कर्मचारी आजारी होते. रविवारी सकाळी थंडी वाजून त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात आली आहे.
- लखमी गौतम, जिल्हा पोलीस अधीक्षक.