रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:46 IST2019-03-26T23:46:17+5:302019-03-26T23:46:32+5:30

अ‍ॅपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाइकांचा रोष उफाळून आला. इर्विनमधील डॉक्टरांच्या हलगर्जीनेच मृत्यू झाला असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. त्यामुळे सोमवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूत प्रचंड खळबळ उडाली.

The death of the patient, the doctor's negligence charges | रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

ठळक मुद्देइर्विनच्या आयसीयूतील घटना : कारवाईची मागणी करून नातेवाइकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अ‍ॅपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाइकांचा रोष उफाळून आला. इर्विनमधील डॉक्टरांच्या हलगर्जीनेच मृत्यू झाला असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. त्यामुळे सोमवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूत प्रचंड खळबळ उडाली. घटनास्थळी दाखल झालेल्या कोतवाली पोलिसांनी नातेवाइकांची समजूत घातली. त्यांना तक्रार करण्यास सांगितल्यानंतर नातेवाइकांचा रोष शांत झाला.
लोणटेक येथील रहिवासी साहेबराव नागोराव पळसकर (५०) यांना अ‍ॅपेंडिक्सचा त्रास झाल्याने त्यांना १५ मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. १८ मार्च रोजी शस्त्रक्रिया निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव २२ मार्च रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर साहेबराव पळसकर यांना इर्विनच्या अतिदक्षता कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक बिघडली. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
साहेबराव पळसकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावरही त्यांचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक संपप्त झाले. डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाइकांनी रोष व्यक्त केला. इर्विन येथील डॉ. मोहिते यांनी ती शस्त्रक्रिया केली, फिजिशयन डॉ. मोरे होते, तर आयसीयूत वैद्यकीय अधिकारी सुभाष तितरे उपस्थित होते.
नातेवाइकांचा रोष पाहता, तेथील डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. कोतवालीचा पोलीस ताफा काही वेळातच आयसीयूत पोहोचला. स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांनी नातेवाइकांची समजुत काढली. यासंदर्भात तक्रार करण्यास नातेवाइकांना सांगितल्यावर त्यांचा रोष शांत झाला. त्यानंतर पोलिसांनी साहेबराव पळसकर यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवला. मंगळवारी दुपारच्या सुमारास मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळीसुद्धा नातेवाईक संतप्त झाले होते.
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे कारण निश्चित होऊ शकेल. नातेवाइकांच्या आरोपावरून चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीच्या अहवालावरून कार्यवाहीची दिशा ठरेल.
- श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: The death of the patient, the doctor's negligence charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.