डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वृद्धाचा मृत्यू
By Admin | Updated: June 19, 2014 23:35 IST2014-06-19T23:35:19+5:302014-06-19T23:35:19+5:30
स्थानिक डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) येथे गुरूवारी मध्यरात्री १२.४५ वाजता मधुमेहाचा आजार असलेल्या एका रूग्णाचा मृत्यू झाला. श्रीराम बापुराव दयालकर (५५,रा.खोलापूर) असे मृताचे नाव आहे.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वृद्धाचा मृत्यू
नातेवाईकांचा आरोप : परिचारिकेच्या श्रीमुखात लगावली, पीडीएमसी रुग्णालयातील घटना
अमरावती : स्थानिक डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) येथे गुरूवारी मध्यरात्री १२.४५ वाजता मधुमेहाचा आजार असलेल्या एका रूग्णाचा मृत्यू झाला. श्रीराम बापुराव दयालकर (५५,रा.खोलापूर) असे मृताचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे श्रीराम दयालकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांचा मुलगा श्रीकांत दयालकर याने येथील परिचारिकेच्या श्रीमुखात लगावली.
श्रीराम दयालकर यांना मधुमेहाचा आजार असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. गुरूवारी त्यांची प्रकृृती बिघडली. त्यामुळे त्यांचा मुलगा श्रीकांत याने तेथील परिचारिकेला बोलाविले. परंतु कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेने प्रतिसाद दिला नाही. अखेर श्रीराम दयालकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत रूग्णालयात गोंधळ घालणे सुरू केले. श्रीकांतने कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेच्या श्रीमुखात लगावली. घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक अविनाश मेश्राम यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन श्रीराम दयालकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविला. पोलिसांनी पंचनामा करून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.