वऱ्हा येथे एसटीखाली चिरडल्याने वृध्दाचा मृत्यू
By Admin | Updated: February 20, 2016 00:41 IST2016-02-20T00:41:55+5:302016-02-20T00:41:55+5:30
एसटीतून खाली उतरताच चाकाखाली येऊन एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९. १५ वाजताच्या सुमारास वऱ्हा बसस्थानकावर घडली.

वऱ्हा येथे एसटीखाली चिरडल्याने वृध्दाचा मृत्यू
अमरावती : एसटीतून खाली उतरताच चाकाखाली येऊन एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९. १५ वाजताच्या सुमारास वऱ्हा बसस्थानकावर घडली. रामराव आकाराम वाघमारे (७०) असे मृतकाचे नाव आहे. अशाच अपघात मागील वर्षी माहुली (जहागिर) येथे चिमुकल्या साहिल डायरेचा बसखाली आल्याने मृत्यू झाला होता. याच घटनेचा हा अपघात पुनरावृत्ती ठरला. नागरिकांच्या रोषाला पोलिसांनी वेळीच आवर घातल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्यातंर्गत घोटा येथील रहिवासी रामराव वाघमारे (७०) हे सकाळी कुऱ्हा ते मोझरीकडे जाणाऱ्या बसगाडी एमएच ४०-८४५४ मध्ये घोटा येथून बसले होते. वऱ्हा गावातील बसस्थानकावर बस थांबताच ते खाली उतरले. मात्र, त्याचवेळी बसगाडी समोर जाण्यासाठी निघाल्याने रामराव हे चाकाखाली आले. त्यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. हा अपघात घडताच बस चालकांनी त्यांना बसमध्ये घेवून मोझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे तेथून त्यांना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला. तसेच बस आगार प्रमुखांनी इर्विन रुग्णालयात धाव घेऊन मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली. रामराम यांच्या पश्चात पत्नी कमला, एक मुलगा, दोन मुली, सुन व नांतवड असा आप्त परिवार आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करीत आहे.