तलावात बुडून बाप-लेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 16:03 IST2017-01-02T16:03:39+5:302017-01-02T16:03:39+5:30
सुटीचा दिवस असल्याने बकऱ्या चारायला गेलेल्या चिमुकल्यासह त्याच्या वडिलांचा तलावात बुडून मृत्यू झाला.

तलावात बुडून बाप-लेकाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
धामणगाव रेल्वे, दि. 2 - सुटीचा दिवस असल्याने बकऱ्या चारायला गेलेल्या चिमुकल्यासह त्याच्या वडिलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावात सोमवारी एकही चूल पेटली नाही़
सुधाकर गोविंद ठोकळे (४२) व दर्शन सुधाकर ठोकळे (८) अशी मृतांची नावे आहेत. सुधाकर यांनी रविवारी घरच्या बकऱ्या शेतात चारण्यासाठी नेल्या होत्या. रविवारी सुटी असल्याने त्यांचा आठ वर्षांचा मुलगा दर्शन देखील स्वत:ची सायकल घेऊन वडिलांसोबत शेतात गेला. सायंकाळी बकऱ्या पाणी पिण्यासाठी गावाशेजारी असलेल्या साठवण तलावावर गेल्यात. बकरी तलावात पडू नये म्हणून तिला हाकण्यासाठी चिमुकला दर्शनही मागोमाग गेला. परंतु पाय घसरून तो तलावात पडला. चिमुकल्याचा आवाज ऐकताच वडील सुधाकर त्याला वाचविण्यासाठी गेले असता दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला़
सायंकाळ होऊनही बाप-लेक घरी न परतल्याने संपूर्ण गाव त्यांच्या शोधात निघाले. खूप शोध घेतला असता गावानजीकच्या तलावाजवळ चिमुकल्या दर्शनची सायकल व वडील सुधाकर यांची चप्पल आणि विळा आढळून आला. पोलिसांनी उशिरा रात्री तलावाच्या गाळात अडकलेले दोघांचे मृतदेह बाहेर काढले. सोमवारी सकाळी ग्रामीण रूग्णालयात बाप-लेकाच्या मृतदेहांचे विच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दाभाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ बाप-लेकांच्या या दुर्देवी मृत्युमुळे गावात सोमवारी शोकाकूल वातावरण होते. एकाही घरात चूल पेटली नाही़ मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र होटे, त्र्यबंक काळे अधिक तपास करीत आहेत. चिमुकला दर्शन हा धामणगाव येथील रावसाहेब रोंघे मेमोरीयल इंग्लिश स्कूल येथे दुसऱ्या वर्गात शिकत होता. सोमवारी श्रद्धांजली वाहून शाळेला सुटी देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)