उपचाराअभावी शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: November 10, 2014 22:35 IST2014-11-10T22:35:52+5:302014-11-10T22:35:52+5:30
नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली.

उपचाराअभावी शेतकऱ्याचा मृत्यू
अमरावती : नापिकीमुळे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक तासापर्यंत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिराळा येथे रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. याप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. तसेच मृतदेहही आरोग्य केंद्रासमोर ठेवला होता.
शिराळा येथील सुरेश शंकरराव समरीत (४५), असे मृताचे नाव आहे. केवळ दीड एकर शेती असलेल्या सुरेश समरीत यांना यावर्षी एकरी एक पोते सोयाबीन झाले. पीक पेरणीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. परंतु उत्पादन न झाल्याने हताश झालेल्या सुरेशने राहत्या घरी रविवारी सायंकाळी विष प्राशन केले.
ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने शिराळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. परंतु आरोग्य केंद्रात वैद्यकीय अनुपस्थित होते.
याचवेळी पंचायत समिती सदस्य राजू गंधे येथे पोहोचले. त्यांनी लगेच वैद्यकीय अधिकारी भगत यांच्याशी संपर्क साधला. परंतु आता ड्युटी डॉ. चव्हाण यांची असल्याची माहिती भगत यांनी दिली. त्यामुळे चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही आपली ड्युटी नसून सध्या पुलगाव येथे असल्याचे पंचायत समिती सदस्य गंधे यांना दूरध्वनीवरुन सांगितले.
एक तास हा घटनाक्रम सुरु असताना विष प्राशन केलेला शेतकरी सुरेश समरीत यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यांना उपचार मिळावे म्हणून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी शवविच्छेदनानंतर दुपारी १२ वाजता मृतदेह शिराळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आणून ठेवला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नापिकीने त्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती. तब्बल चार तास मृतदेह आरोग्य केंद्रात ठेवला होता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी एन. एन. भालेराव यांनी येथे भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आपल्या मागण्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांच्यापर्यंत पोहोचून तेच आरोग्य उपसंचालकाकडे प्रस्ताव पाठवितील, असे आश्वासन दिले. परंतु संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहिल, अशी भूमिका आंदोलनाचे नेतृत्व करणारे पंचायत समिती सदस्य राजू गंधे यांनी घेतली होती. वृत्तलिहिस्तोवर आंदोलन सुरुच होते.
या आंदोलनात जयंत आमले, प्रकाश अजमिरे, मुसाफीर खाँ पठाण, पद्माकर हटवार, रईस खॉ पठाण, प्रभाकर भागवत, प्रल्हाद गभने आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.