व्यापारी देणार अडत
By Admin | Updated: July 10, 2016 00:02 IST2016-07-10T00:02:05+5:302016-07-10T00:02:05+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या मालाची अडत (दलाली) शेतकऱ्यांऐवजी खरेदीदार देणार आहे.

व्यापारी देणार अडत
अधिसूचना जारी : शेतकऱ्यांची सुटका, व्यापाऱ्यांचा तीळपापड
अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या मालाची अडत (दलाली) शेतकऱ्यांऐवजी खरेदीदार देणार आहे. याबाबतची अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली. शुक्रवारी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी सर्व बाजार समित्यांना दिले आहे.
अडत द्यायची कुणी, हे वर्षभरापासून भिजतघोंगडे पडले होते. शासनाने याबाबत समिती स्थापन करून तीन महिन्यांच्या आत अहवाल मागविला होता. परंतु विहित मुदतीच्या आत समितीचा अहवाल तयार न झाल्याने समितीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्यासह व्यापारीदेखील या समितीत होते. अखेर या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला व शेतमालाची अडत ही शेतकऱ्यांनी नव्हे तर खरेदीदारांनी द्यावी ही अधिसूचना शासनाने जारी केली.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा व ग्राहकांना देखील स्वस्त व चांगला माल मिळावा यासाठी भाजी व फळांची थेट विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याविषयीचा अध्यादेश राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या आदेशाने अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी ५ जुलै रोजी जारी केला. त्यामुळे बाजार समितीमध्ये असणारी व्यापाऱ्यांची मक्तेदारी संपुष्ठात आली. भाजीपाला, फळे व मसाल्यांच्या पदार्थाची बाजार समितीबाहेर विक्री करण्यासाठी आता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. बाजार समितीमध्ये येणाऱ्या कृषी मालावर फक्त एकदाच बाजार फीची आकारणी होईल व येथून शेतमाल दुसऱ्या बाजार समितीमध्ये नेल्यावर पुन्हा फी आकारता येणार नाही. राज्यातील ३०५ बाजार समित्या व उपबाजारामध्ये अडत ही शेतकऱ्यांच्या पट्टीमधून कापल्या जायची परंतु यापुढे शेतकऱ्यांच्या पट्टीतून कोणत्याही वसुली करता येणार नाही. अडत्यांनी त्यांचे कमिशन खरेदीदाराकडून घ्यायची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्व समित्यांना या अध्यादेशाची प्रत पाठविण्यात येत आलेली आहे. (प्रतिनिधी)
अध्यादेशाच्या अंमलबजावणीची डीडीआरवर जबाबदारी
बाजार समित्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी त्या-त्या जिल्हा उपनिबंधकावर सोपविण्यात आलेली आहे. तुर्तास बाजार समितीमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. मात्र पुढच्या आठवड्यात अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
दोन्ही निर्णय व्यापाऱ्यांच्या जिव्हारी
भाजीपाला नियंत्रणमुक्त करतानाच शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडूनच अडत घेण्याची अधिसूचना जारी झाली. हे निर्णय व्यापाऱ्यांच्या जिव्हारी लागलेले आहे. या निर्णयाविरोधात गुरुवारी काही बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. तर काही बाजार समित्यांमध्ये ११ जुलै रोजी बंद पाळण्यात येणार आहे. खरेदीदारांनी या निर्णयाचा जोरदार विरोध चालविला असून राज्यस्तरावर आंदोलनाची हाक दिली आहे.
शासन आदेशाच्या प्रति सर्व बाजार समित्यांना पाठविण्यात आलेल्या आहेत व अडत खरेदीदारांकडून घ्यायची, असे निर्देश दिले आहेत. या विरोधात कुठल्याही बाजार समितीचे व व्यापारी संघटनेचे निवेदन प्राप्त झालेले नाही.
- गौतम वालदे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)
अडते व खरेदीदारांची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. शासनाच्या आदेशाबाबत त्यांना अवगत करण्यात आले. अडत शेतकऱ्यांकडून घेऊ नये, असे बजावण्यात आले.बाजार समिती शासनादेशाची काटेकोर अंमलबजावणी करेल.
- सुनील वऱ्हाडे,
सभापती, बाजार समिती,
अमरावती