पाच वर्षात २०० पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले
By Admin | Updated: February 11, 2015 00:23 IST2015-02-11T00:23:40+5:302015-02-11T00:23:40+5:30
पोलीस पाटील हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असतांना ....

पाच वर्षात २०० पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले
लोकमत विशेष
मोहन राऊत अमरावती
पोलीस पाटील हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असतांना मागील पाच वर्षात २०० पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती आहे़
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व निवडणूका सांभाळताना पोलीस पाटलांची मोठी कसरत होते़ गावातील दोन गट एकमेकांसमोर उभे झाल्यानंतर पोलीस पाटलांना मध्यस्थी करतांना स्वत:चा जीव धोक्यात टाकावा लागतो़ तंटामुक्त गाव अभियान यशस्वी करण्यात पोलीस पाटलांची महत्वाची भूमिका आहे़ मागील शासनाने मानधन वाढविण्यासंदर्भात आश्वासन दिले होते़ परंतु हे आश्वासन हवेतच विरले आहे़ आज राज्यात तंटामुक्त ग्राम अभियान पोलीस पाटलामुळे यशस्वी झाले आहे़
पोलीस पाटलासाठी प्रत्येक गावात शासकीय कार्यालय देण्याचा ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढला परंतु या अध्यादेशाची अमंलबजावणी आजपर्यंत झाली नाही़
राज्यातील प्रत्येक गावात पोलीस पाटील नियुक्त करण्याचे तथा रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकणे गरजेचे होते़ आजही दहा ते पंधरा गावांचा प्रभार एका पोलीस पाटलाला सांभाळावा लागतो़
अनेक गावांचा कारभार सांभाळताना पोलीस पाटील गावच्या राजकीय दुषित वातावरणाचा बळी ठरत आहे़
आजपर्यंत राज्यातील अनेक पोलीस पाटलांवर चौकशी न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ विशेषत: ज्या गावाचा अतिरीक्त कारभार सांभाळला त्या गावांचा वेतन स्वरूपात मोबदला मिळत नाही़ गावातील शातंता सुव्यवस्था कायम ठेवणे, अनेक कामावर आळा घालणे, चोरी व विविध घटनेकडे लक्ष ठेवून ग्रामस्थांचे सरंक्षण करण्याचे काम पोलीस पाटलावर आहे़
आपले कर्तव्य ईमानेइतबारे सांभाळत असताना आजही मानधनाचा सात हजार रूपयांचा प्रश्न, वयाच्या ६५ वर्षापर्यंत सेवा, गावातील पोलीस पाटलांची रिक्त पदे, निवृत्त वेतन, अनुकंपा मध्ये पोलीस पाटलांच्या वारसांची नियुक्ती, आजारासाठी लागणारा वैद्यकीय खर्च असे अनेक प्रश्न शासनदरबारी पडले आहेत.
आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ले झाले त्यांची चौकशीही थंडबस्त्यात असल्याची पोलीस पाटील संघटनेची तक्रार आहे़