रोही समजून आणली मृत कालवड
By Admin | Updated: February 14, 2015 23:58 IST2015-02-14T23:58:55+5:302015-02-14T23:58:55+5:30
राष्ट्रीय महामार्गावर लोणी (टाकळी) नजीक झालेल्या अपघातात रोही मृत्युमुखी पडल्याची माहिती वन विभागाच्या शिकार प्रतिबंधक पथकाला मिळाली.

रोही समजून आणली मृत कालवड
अमरावती : राष्ट्रीय महामार्गावर लोणी (टाकळी) नजीक झालेल्या अपघातात रोही मृत्युमुखी पडल्याची माहिती वन विभागाच्या शिकार प्रतिबंधक पथकाला मिळाली. त्यानुसार चमू घटनास्थळी पोहोचली अन् मृत्यू पडलेल्या जनावराला ताब्यात घेतले. मात्र दुसऱ्या दिवशी हे जनावर रोही नसून कालवड असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेवरुन दोन दिवसांपूर्वी वनाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या तू- तू, मै- मै च्या वादाची चर्चा वन विभागात चांगलीच रंगू लागली आहे.
वनविभागाचे अधिकारी, कर्मचऱ्यांना वन्यप्राणी, जनावरांची इत्यंभूत माहिती असणे अपेक्षित आहे. मात्र शिकार प्रतिबंधक पथकाच्या प्रमुखालाच जनावरांची ओळख नसल्याचे सिद्ध झाले आहे. दोन दिवसांपूर्वी लोणी येथे राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत रोही मृत्युमुखी पडल्याची माहिती पथकाला मिळाली. काही वेळाने हे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाहून मृत जनावर ताब्यात घेऊन ते येथील वडाळी वनपरिक्षेत्राच्या कार्यालयात आणले गेले.
मात्र यावेळी हजर असलेल्या काही वनकर्मचाऱ्यांनी हे वन्यप्राणी रोही नसून कालवड (गाईचे बछडे) असल्याचे वारंवार सांगितले. परंतु शिकार प्रतिबंधक पथकाच्या प्रमुखांनी हे वन्यप्राणी रोहीच असल्याचा दावा केला. कालवड की रोही? यावरुन वनकर्मचारी आणि अधिकारी यांच्यात बराच वाद झाला. अखेर शिकार प्रतिबंधक पथकप्रमुखांनी हे मृत प्राणी येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात नेले. वडाळी येथील वनकर्मचारी शिकार प्रतिबंधक पथकाला सहकार्य करीत नाही, असा आरोप करुन या पथकाच्या प्रमुखाने सीसीएफच्या पुढ्यात तक्रारीचा पाढा वाचला. पथकाने ताब्यात घेतलेले हे मृत प्राणी नेमके काय? हे सीसीएफने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मृत प्राणी रोही नसून कालवड असल्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना वन्यप्राण्यांबाबतची माहिती नसल्याचे दिसून येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मृत कालवड वरुन दोन बड्या अधिकाऱ्यांकडे थेट तक्रारदेखील करण्यात आली. वनविभागात परस्पर हेवे दावे, वाद असल्याचे स्पष्ट होते.