मृत मांजराचे दूषित पाणी गुरांना !
By Admin | Updated: October 24, 2015 00:14 IST2015-10-24T00:14:47+5:302015-10-24T00:14:47+5:30
बडनेऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरांच्या बाजार परिसरातील विहिरीत कित्येक दिवसांपासून मांजर पडून सडली आहे.

मृत मांजराचे दूषित पाणी गुरांना !
तीव्र रोष : बाजार समितीचे दुर्लक्ष, गंभीर संक्रमणाचा धोका
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
बडनेऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरांच्या बाजार परिसरातील विहिरीत कित्येक दिवसांपासून मांजर पडून सडली आहे. यामुळे पाण्यात अळ्या झाल्या आहेत. हे पाणी बाजारातील जनावरांना पिण्यासाठी सोडले जाते. बाजार समिती प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जिवीत हानीला निमंत्रण मिळत आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत दर शुक्रवारी बडनेऱ्यात गुरांचा बाजार भरतो. बाजाराचा मोठा परिसर आहे. या बाजारात महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब, बिहार आदी राज्यांतून म्हशी विक्रीसाठी येतात. या बाजारात शुक्रवारी मोठी उलाढाल होत असते. बाजाराच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी असते. मात्र याकडे बाजार समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. बाजार परिसरात विहीर आहे. या विहिरीवर मोटपंप आहे. थोड्याच अंतरावर एक टाके आहे. विहिरीतील पाणी जनावरांना पिण्यासाठी टाक्यात सोडले जाते. बऱ्याच दिवसांपासून या विहिरीत एक मांजर मृत अवस्थेत पडले आहे. हे मांजर पाण्यामुळे सडली आहे. त्याच्या भोवताल पाण्यातच शेकडो किडे, अळ्या तयार झाले आहेत. हेच पाणी जनावरांसाठी वापरण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर परिसरातील हॉटेलचालक व खरेदी व विक्रीदारदेखील वापरत होते. ज्यांना विहिरीत मांजर पडल्याची माहिती होती त्यांनी या पाण्याचा वापर टाळला. मात्र जनावरांना हे पाणी पाजण्यात येत आहे. बाजार समितीच्या दुर्लक्षितपणावर तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. विहिरीत मांजर पडल्याची माहिती बाजारात येणाऱ्यांनी व्यवस्थापकास दिल्याचे बोलले जात होते. आरोग्याची हानी टाळण्यासाठी हॉटेलचालकांनी बाहेरुन पाणी बोलावले होते. जनावरांना या घाणेरड्या पाण्यापासून इजा पोहोचल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला जात आहे.
बाजार समिती पावत्या फाडण्यासाठी आहे का?
गुरांच्या बाजारातील विहिरीत बऱ्याच दिवसांपासून मृत मांजर सडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे विहिरीत शेकडो अळ्या झाल्या आहेत. दूरदूरुन येणाऱ्या जनावरांना पाणी कसे पाजायचे? बाजार समिती केवळ पावत्या फाडण्यासाठीच आहे का, असा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला आहे. बाजारात आवश्यक त्या बाबींकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष पुरविणेदेखील गरजेचे आहे.
विहिरीत मृत मांजर असल्याची माहिती गुरुवारी रात्री मिळाली. मांजरीला शुक्रवारी बाहेर काढण्यात आले. पाणी स्वच्छ करणाऱ्या उपाययोना केल्या आहेत. यानंतर विहिरीला पक्के झाकण बसविले जाईल. बाजार समिती याकडे लक्ष ठेवून आहे. हे पाणी केवळ जनावरे धुण्यासाठीच वापरले जाते, पिण्यासाठी नाही.
- आर.पी. वानखडे,
विभाग प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार पेठ, बडनेरा.