डीसीपींच्या अख्त्यारितील वाहतूक सुधारणेचा विशेष स्कॉड काढला
By Admin | Updated: August 11, 2014 23:37 IST2014-08-11T23:37:48+5:302014-08-11T23:37:48+5:30
महानगरातील बेशिस्त वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी पोलीस उपायुक्त बी. के. गावराने यांच्या नेतृत्वात ५ जवानांचा विशेष स्कॉड निर्माण करण्यात आला होता.

डीसीपींच्या अख्त्यारितील वाहतूक सुधारणेचा विशेष स्कॉड काढला
अमरावती : महानगरातील बेशिस्त वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी पोलीस उपायुक्त बी. के. गावराने यांच्या नेतृत्वात ५ जवानांचा विशेष स्कॉड निर्माण करण्यात आला होता. मात्र या स्कॉडने वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी कोणतीही दखलपात्र कारवाई केली नाही. परिणामी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी हा स्कॉड रद्द करण्याचा निर्णय सोमवारी घेतला.
महानगरातील चौकाचौकात वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शिपाई नेमण्यात आले आहे. मात्र बेशिस्त वाहतूक सुधारण्याचे कोणतेही नाव घेत नाही. कर्तव्यावर वाहतूक शिपाई राहत असताना नियंत्रण नसल्याचे ‘लोकमत’ने हा विषय लोकदरबारात पुराव्यानिशी मांडला आहे.
वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि शिस्त लागावी यासाठी विशेष स्कॉड तैनात असताना या स्कॉडने कोणतीही दखलपात्र कारवाई केली नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. परिणामी पोलीस उपायुक्त बी.के. गावराने यांच्या नेतृत्वात पाच शिपायांचा विशेष स्कॉड रद्द करण्यात आला आहे. या स्कॉडमध्ये अरूण चव्हाण, प्रदीप लोणारे, मनीष सावरकर, कासम पटेल, कमलेश शिंदे नामक वाहतूक शिपायांचा समावेश होता. ‘लोकमत’ने विस्कळीत वाहतूक व्यवस्था आणि कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक शिपायांचे बोलके छायाचित्र प्रकाशित करताच पोलीस आयुक्त मेकला यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती सूत्राकडून मिळाली.
अशातच रहाटगाव ते एमआयडीसी मार्गावर जड वाहनांना थांबवून इंधन तपासणीच्या नावाखाली स्कॉडमधील वाहतूक शिपाई अवैध वसुली करीत असल्याची तक्रार पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना प्राप्त झाली आहे.
त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त गावराने यांना सूचना देत स्कॉड रद्द करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. हा स्कॉड रद्द करून कार्यरत जागी पाचही शिपायांना पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)