पान २ ची बॉटम
श्यामकांत पाण्डेय
धारणी : मेळघाटात अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा आठवडा असतानासुद्धा पूर्ण आठवडा कर्तव्य बजावण्याचे सोडून प्रारंभी व शेवटच्या दिवशी हाफ डे करण्याची पद्धत अवलंबवली आहे. त्यामुळे येथील कर्मचारी पाच दिवसांऐवजी केवळ चार दिवसच शासकीय कामे करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पूर्वी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी असल्यामुळे साधारणत: अपडाऊन करणारे कर्मचारी पाच दिवस कर्तव्य बजावत होते. परंतु आता शासनाने सोमवार ते शुक्रवार, असा पाच दिवसांचा कार्यालयीन आठवडा केल्याने शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवस सेवा बजावणे बंधनकारक आहे. मात्र, मेळघाटात बाहेरून अप-डाऊन करणारे कर्मचारी जुन्या प्रथेनुसार दर सोमवारी दुपारी १२ ते २ दरम्यान ड्युटीवर हजर होतात आणि शुक्रवारी दोनच्या दरम्यान परतीच्या प्रवासासाठी कर्तव्य सोडून पळ काढत असल्याचे सर्वसामान्य चित्र शासकीय कार्यालयात पहावयास मिळत आहे. नियंत्रणाची जबाबदारी असलेले विभागप्रमुख वा कार्याुय प्रमुखच स्वत: बेपत्ता राहत असल्यामुळे कुणाचाही पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही. याकडे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
---
कर्मचारी ठिक, बाकीच्यांचे काय?
धारणी तालुक्यात न्यायालयीन आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी नियमांचा आदर करतात. त्यांना पाच दिवसांचा आठवडा नसतानासुद्धा त्यांचे कार्य नियमितपणे कार्यालयीन वेळेत पूर्ण करण्यात येते. परंतु या दोन विभागाव्यतिरिक्त महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद अंतर्गत येणारे लघुसिंचन विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग यांचेसह इतर शासकीय कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा लागू झालेला आहे. जनतेची बहुतांशी कामे या कार्यालयांशी निगडित असल्यामुळे त्यांचेकडून प्रामाणिकपणे काम करण्याची अपेक्षा शासनाने ठेवली होती. परंतु या उद्देशाला मेळघाटात हरताळ फासण्यात येत असून अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे चार दिवसांचा आठवडा सुरू आहे, असे चित्र पाहावयास मिळत आहे.