कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी माहिती संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST2021-02-27T04:16:17+5:302021-02-27T04:16:17+5:30
अमरावती : तिसऱ्या टप्प्यातील ज्येष्ठ आणि व्याधिग्रस्त नागरिकांच्या कोराेना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य ...

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी माहिती संकलन
अमरावती : तिसऱ्या टप्प्यातील ज्येष्ठ आणि व्याधिग्रस्त नागरिकांच्या कोराेना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आशा सेविकांमार्फत लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे माहिती संकलन सुरू केले आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने २४ फेब्रुवारीला येत्या १ मार्चपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला संपूर्ण देशभरात सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा केली. परंतु, तयारीबाबत आरोग्य विभागाला मार्गदर्शक सूचना अप्राप्त आहेत. यादरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत १४ तालुक्यांतील आशा सेविकांच्या मदतीने यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यात जिल्हाभरातील असंसर्गजन्य आजार असलेली ४० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती व वय वर्षे ६० हून अधिक असलेल्या सर्व व्यक्तींना कोविड-१९ चे लसीकरण केले जाणार आहे.
सदर माहिती संकलित केल्यानंतर लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींची यादी गटप्रवर्तकांमार्फत जिल्हास्तरावर सादर करण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत. विशेष म्हणजे, १ मार्चपासून लसीकरणाचे सुतोवाच शासनाकडून केले असले तरी प्रत्यक्ष कार्यवाही होईल का, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
कोट
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४० वर्षांवरील मधुमेह, रक्तदाब, कर्करोगाने आजारी असलेल्या तसेच ६० वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. याकरिता आशा सेविकांकडून माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी