कारागृहात हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन

By Admin | Updated: October 13, 2016 00:23 IST2016-10-13T00:23:40+5:302016-10-13T00:23:40+5:30

कारागृह हे बंदीशाळा असले तरी ते विविध जाती, धर्म, पंथ, समाजातील गुन्हेगारी बंदीस्तांचे एक छोटे गाव आहे.

Darshan of Hindu unity, Muslim unity in jail | कारागृहात हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन

कारागृहात हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन

मोहर्रम, नवदुर्गोत्सव साजरा : विसर्जन मिरवणुकीने परिसर दणाणला
अमरावती : कारागृह हे बंदीशाळा असले तरी ते विविध जाती, धर्म, पंथ, समाजातील गुन्हेगारी बंदीस्तांचे एक छोटे गाव आहे. येथे सण- उत्सव जाती, धर्माच्या सीमा ओलांडून साजरे केले जातात. याच अनुषंगाने गुरुवारी मोहर्रम आणि नवदुर्गोत्सव विसर्जन मोठ्या थाटात साजरा करण्यात आले. यावेळी हिंदू- मुस्लिम बंदीजन एकत्र आल्याने कारागृहात सामाजिक एकतेचे दर्शन दिसून आले.
अधीक्षक भाईदास ढोले यांनी कारागृहाचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध उपक्रम, उत्सव साजरे करण्यात पुढाकार घेतला आहे. कारागृहात बंदीस्त असलेल्या कैद्यांच्या मनात न्युनगंड किंवा नैराश्याची भावना निर्माण होऊ नये, यासाठी राष्ट्रीय उत्सव, सण, भारतीय संस्कृती जोपासली जात आहे. नवरात्रौत्सवात कारागृहामध्ये पुनर्वसन जन सेवा दुर्गा मंडळ स्थापन करण्यात आले होते. कारागृहाच्या नियमावलीनुसार हिंदू धर्माच्या परंपरेची जोपासना करण्यात आली. सलग नऊ दिवस दुर्गेची आरती व पूजा पाठ करुन बंदीजनांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. गुरुवारी मोहरम उत्सवानिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी कारागृहात सुख, शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच माता दुर्गेची कारागृहात मिरवणूक काढण्यात आली. दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा, यासाठी मनोकामना करण्यात आली. यावेळी प्रतिकात्मक दुर्गा देवी, राक्षस, वाघ आदी वेशभुषा परिधान करुन कैदी बांधवांनी मिरवणूक काढली. मनुष्यातील क्रोध, काम, वासना, लोभ, माया व व्देष हे नायनाट व्हावे, हा मिरवणुकीमागील उद्देश असल्याचे कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी सांगीतले. ही मिरवणूक सर्व बराकीतून जात असताना कैदी बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे चित्र अनुभवता आले. हिंदू, मुस्लिम कैदी सहभागी होऊन ‘हम सब एक है’चा नारा दिला. यावेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी पी. एस. भुसारे, मंडल तुरुंगाधिकारी बी. एस. सदाशीव, राजेंद्र ठाकरे, एम. एस. चव्हाण, वैद्यकीय अधिकारी संजय गणोकर, सुभेदार लांडे, संजय इजाठे आदी उपस्थित होते.

मिरवणुकीत कैद्यांनी बाजवल्या विविध भूमिका
मिरवणुकीत संतोष नरोट यांनी व्यवस्थापकाची भूमिका बजावली. रामेश्वर उजेड (राक्षस), संदेराज कपाटे (देवी), नरेंद्र राठोड (वाघ), दिनकर नरोट (अध्यक्ष), लक्ष्मण शिंदे व मनोहर शेडकर (चोपदार) दिनेश तिवारी (परशुराम), श्रीराम वानखडे व लक्ष्मण इंगोले (ढोलक वादक), गजानन इंगळे, धनराज सुरुसे ( नाल वादक), बंटी उप्पलवार, रमेश नरोट ( पालखी वाहक) वामन कड (मृदुंग वादक) आदींनी विविध भूमिका बजावल्यात.

Web Title: Darshan of Hindu unity, Muslim unity in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.