अंधाऱ्या रात्रीवर चोरट्यांचीच सत्ता !
By Admin | Updated: December 4, 2015 00:28 IST2015-12-04T00:28:05+5:302015-12-04T00:28:05+5:30
शहरात काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी व इतर घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या अनुषंगाने अंधाऱ्या रात्रीवर चोरटेच सत्ता गाजवत असल्याचे उघड झाले आहे.

अंधाऱ्या रात्रीवर चोरट्यांचीच सत्ता !
पाच दुकाने फोडली : रात्रकालीन गस्तीवर प्रश्नचिन्ह
अमरावती : शहरात काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी व इतर घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या अनुषंगाने अंधाऱ्या रात्रीवर चोरटेच सत्ता गाजवत असल्याचे उघड झाले आहे. बुधवारी रात्री शहर कोतवाली हद्दीतील ५ दुकाने फोडल्याच्या घटनेने तर रात्रकालीन गस्तीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. वालकट कम्पाऊंडमधील पाच दुकाने फोडल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या दुकानांमधून चोरट्यांनी सुमारे ९५ हजारांचा ऐवज लांबविला.
एकाच रांगेत असलेली पाच दुकाने एकाच रात्रीतून फोडण्यात आली. वालकट कम्पाऊंड परिसरात केडिया ट्रेडर्स, महेश ट्रेडिंग, दातेराव इलेक्ट्रॉनिक्स यासह भारत आॅटो व विमल आॅटो ही दुकाने एका लाईनमध्ये आहेत. पाचही प्रतिष्ठानांचे संचालक बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास प्रतिष्ठान बंद करून घरी गेले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही सारी मंडळी आपआपली प्रतिष्ठाने उघडण्यासाठी आली. तथापि या सर्व प्रतिष्ठानांची बाहेरची कुलुपे सुस्थितीत होती. प्रतिष्ठान उघडल्यानंतर आतील साहित्य अस्तव्यस्त दिसून आले. मात्र दुसऱ्या माळ्यावरील छतावर जाऊन पाहिले असता तेथील कुलुपे तुटलेल्या अवस्थेत आढळली. महेश ट्रेडिंगचे संचालक गौरीशंकर हेडा यांनी प्रथम शहर कोतवालीत तक्रार नोंदविली. हेडा यांच्या महेश ट्रेडिंगमधून चोरट्याने ८० हजार रुपये चोरून नेले. नजीकच्या दातेराव इलेक्ट्रॉनिक्समध्येही चोरटे शिरले. मात्र त्यांच्या काऊंटरमध्ये रक्कम नसल्याने नुकसान टळले. चोरट्याने अन्य कुठल्याही साहित्याला हात लावला नाही, असे अजय दातेराव यांनी सांगितले. याशिवाय केडिया ट्रेडर्समध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. सावन राठी यांच्या विमल आॅटो या प्रतिष्ठानाचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. तेथे चोरट्यांचे हाती रक्कम लागली नाही. तर सिंधूनगर येथील सुनील अगनानी संचालित भारत आॅटोमधून चोरट्यांनी गल्ल्यातील १५ हजार रुपये चोरून नेले. एकाच रात्रीतून एकाच रांगेत असलेली पाच दुकाने फोडल्याच्या घटनेने व्यापारी वर्तुळात खळबळ माजली आहे. तर पोलिसांच्या रात्रकालीन गस्तीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर कोतवालीसह गुन्हेशाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले. महेश ट्रेडिंग व्यतिरिक्त अन्य कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे आढळून आले नाही.
श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांनाही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. चोरटे कुठलेतरी वाहन घेऊन आले असावे आणि चोरट्यांची संख्या २ किंवा त्यापेक्षा अधिक असावी, अशी शक्यता गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी व्यक्त केली.