वस्तीतील मोबाईल टॉवर ठरताहेत धोकादायक

By Admin | Updated: March 16, 2015 00:21 IST2015-03-16T00:21:22+5:302015-03-16T00:21:22+5:30

स्थानिक रहिवाशांचा विरोध असतानाही नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे जुळ्या शहरात मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.

Dangerous mobile towers are fixed | वस्तीतील मोबाईल टॉवर ठरताहेत धोकादायक

वस्तीतील मोबाईल टॉवर ठरताहेत धोकादायक

लोकमत विशेष
सुनील देशपांडे  अचलपूर
स्थानिक रहिवाशांचा विरोध असतानाही नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे जुळ्या शहरात मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. जीवनपुऱ्यातील रहिवाशांनी नगरपालिकेकडे तक्रार केल्यावरही काम थांबले नाही तर ब्राम्हणसभा येथील टॉवर उभारणीच्या कामाबद्दल लोकांनी पालिकेत धाव घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. रायपूरा येथील मोबाईल टॉवर कोसळला होता हे विशेष.
जीवनपुऱ्यातील विश्वनाथ धनवंत यांच्या खासगी जागेत नगरपालिकेची परवानगी घेतली नसताना मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. टॉवरच्या पूर्वेकडे माध्यमिक शाळा, उत्तरेकडे खंडेझोड तर दक्षिणेकडे बाहेकर यांचे घर आहे. टॉवरच्या बांधकामासाठी आजूबाजूच्या शेजाऱ्यांची परवानगी न घेता बिनदिक्कतपणे टॉवर उभारले जात आहे. या टॉवरच्या रेडीशनमुळे भविष्यात येथील नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागेल. हे टॉवर मानवी वस्तीपासून दूर एखाद्या शेतात उभारण्यात यावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून बळीराम बाहेकर, दिलीप जिराफे, अमोल माळवे, गणेश मेटकर, अजीजखाँ पठाण, मंदा भारती, नीलेश वऱ्हेकर आदींनी दिला होता. हे निवेदन देऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाल्यावरही टॉवर उभारणीचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. लोकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून २४ जून २०१४ रोजी मुख्याधिकाऱ्यांनी येथील टॉवर उभारणीस परवानगी दिली. उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांच्या पत्रालाही पालिकेने केराची टोपली दाखवून टॉवर उभारणीला अनुमती दर्शविली होती, हे उल्लेखनीय. पर्यावरण संरक्षण कायदा १९६६ नुसार मोबाईल टॉवर उभारण्यासाठी आवश्यक आहे. परंतु हे टॉवर उभारताना हेतूपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. संबंधित अधिकारी आपले हात ओले करून टॉवर उभारणीला मूकसंमती देतात, असे जनतेचे म्हणणे आहे. यापूर्वी रायपुरा येथील विजय टेंभरे यांच्या जागेत मोबाईल टॉवर उभारण्यात आले होते. मागील १७ फेब्रुवारीला हा टॉवर उभारताच पडला होता. सुदैवाने प्राणहानी टळली.

तीव्र आंदोलनाचा इशारा
परतवाडा येथील ब्राह्मण सभेत मोबाईल टॉवरचा मुद्दा पुन्हा गरम झाला. येथील मोबाईल टॉवर उभारणीचे काम स्थानिक रहिवाशांचा विरोध झुगारून सुरू आहे. लोकांनी हे काम बंद पाडून नगरपालिकेत धाव घेतली होती. पुन्हा काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान काही विपरीत घडल्यास मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा श्याम क्षीरसागर, अतुल देशमुख, रवी पिदडी, किशोर कासार, वानखडे, नशिबकर यांनी दिला आहे.


जे मोबाईल टॉवर अवैध आहेत त्यांना आम्ही नोटीसी बजावली आहेत. नोटीसला ते जुमानत नसतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करू.
- धनंजय जावळीकर
मुख्याधिकारी, अचलपूर न. प.

Web Title: Dangerous mobile towers are fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.