संत्र्यावर घातक कोळशीचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: October 1, 2015 00:35 IST2015-10-01T00:35:41+5:302015-10-01T00:35:41+5:30
जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन क्षेत्रात घातक कोळशीचा प्रादुर्भाव झाला आहे.

संत्र्यावर घातक कोळशीचा प्रादुर्भाव
वेळीच व्यवस्थापन गरजेचे : संत्रा उत्पादकांना सहकार्याची गरज
अमरावती : जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन क्षेत्रात घातक कोळशीचा प्रादुर्भाव झाला आहे. अत्यंत घातक असणाऱ्या कोळशीचे वेळीच नियंत्रण न केल्यास झाडाचे आरोग्य, आयुष्यमान, यावर विपरीत परिणाम होऊन संत्राचे उत्पादन तसेच गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
जिल्ह्यातील काही भागात पांढरी-काळी माशीमूळे उत्पन्न होणाऱ्या कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यापूर्वी विदर्भात ८० चे दशकात या रोगाचा भयानक उद्रेक होऊन संत्रा बगिच्याची मोठी हानी झाली होती. त्यामुळे या भागातील संत्रा लागवडसुध्दा मंदावली होती. सामूहिक प्रयत्नानंतर कोळशीला अटकाव करण्यास यश मिळाले व संत्र्याच्या लागवड क्षेत्रातदेखील वाढ झाली. यंदा मात्र काही भागात काळ्या माशीचा उपद्रव वाढल्याचे कृषितज्ञांनी सांगितले. यापूर्वीचा कोळशीविषयी वाईट अनुभव लक्षात घेता संत्रा उत्पादकांनी वेळीच सतर्क राहून तज्ज्ञांच्या सहकार्याने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे संत्रा पीक संरक्षण योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर मोनोक्रोटोफॉस व डायमेथोएट या कीटकनाशकांचे वितरण सुरू आहे. परंतु यामध्ये २ हजार ४९१ हेक्टर संरक्षण क्षेत्र असल्याने हे प्रयत्न तोकडे ठरत आहेत. यासाठी शासन स्तरावर व्यापक स्वरुपात मोहीम राबविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रापीक आहे. दर्यापूर व भातकुली हा खारपानपट्टा चिखलदरा व धारणी हे संत्रासाठी प्रतिकूल तालुके वगळता जिल्ह्यातील १४ तालुक्यांत मोठ्या प्रमाणात संत्राचे उत्पादन घेतले जाते. (प्रतिनिधी)