पार्किंग हडपणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर दंडुका
By Admin | Updated: October 10, 2016 00:13 IST2016-10-10T00:13:50+5:302016-10-10T00:13:50+5:30
व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे.

पार्किंग हडपणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर दंडुका
अनधिकृत बांधकाम तोडणार : महापालिका आयुक्तांचे निर्देश
अमरावती : व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. २२ संकुलातील पार्किंगच्या ठिकाणी केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार आहे. याशिवाय २३३ मालमत्ताधारकांना आठवडाभराची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. हा केवळ इशारा नसून पार्किंगची जागा हडपणाऱ्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे आयुक्त हेमंत पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अतिक्रमण आणि असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी व्यावसायिक संकुलांनी केलेले अतिक्रमण आणि हडपलेल्या पार्किंगवर नजर रोखली होती. व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगसाठी परवानगी नसताना काही व्यापाऱ्यांनी पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर झोन अभियंत्यांमार्फत तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर ३४० मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्यात. पार्किंगसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यासाठी विहित कालावधी देण्यात आला.
या नोटीसला अनुसरून १०७ मालमत्ताधारकांनी कागदपत्रे सादर केली आहेत. १०७ मालमत्तांपैकी ३३ मालमत्तांची तपासणी करण्यात आली. त्यात २२ ठिकाणी पार्किंगच्या जागी अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आले. पुढील दोन आठवड्यात या २२ ठिकाणचे पार्किंग मोकळे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. कागदपत्रे सादर करणाऱ्या १०७ मालमत्ताधारकांपैकी उर्वरित ७४ मालमत्तांची या आठवड्यात पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पडताळणीनंतर अनधिकृत बांधकामाचा आकडा वाढणार आहे. ज्या २३३ मालमत्ताधारकांनी दस्तऐवज सादर केले नाहीत, त्यांना आठवड्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे बांधकाम अनधिकृत जाहीर करून प्रशासकीय कारवाई करण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे. यासंदर्भात अधिनस्थांची बैठक घेण्यात आली. बैठकीला एडीटीपी सुरेंद्र कांबळे, अभियंता दीपक खडेकार, घनश्याम वाघाडे आदी उपस्थित होते.
शहरातील बहुतांश व्यावसायिक संकुलधारकांनी पार्किंगची जागा गिळंकृत केल्याचे लक्षात येताच तपासणी मोहीम घेण्यात आली. ३४० मालमत्ताधारकांना नोटीसेस बजावण्यात आल्या. २२ ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर दोन आठवड्यात कारवाई केली जाईल.
- हेमंत पवार, आयुक्त , महापालिका