महिलांसाठी ‘दामिनी’ सज्ज
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-03-01T00:10:22+5:302016-03-01T00:10:22+5:30
कामासाठी किंवा इतर कारणांनी घराबाहेर पडणाऱ्या महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे,..

महिलांसाठी ‘दामिनी’ सज्ज
सात पथक तयार : पोलीस आयुक्तांनी दिली हिरवी झेंडी
अमरावती : कामासाठी किंवा इतर कारणांनी घराबाहेर पडणाऱ्या महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे, या दृष्टीने पोलीस विभागातर्फे आता ‘दामिनी’ या नावाने महिला कमांडोंचे पथक तयार करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी महिला कमांडोंची ही पथके शहरात गस्त घालण्यासाठी रवाना करण्यात आली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी या पथकाला हिरवी झेंडी दिली.
यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, पोलीस निरीक्षक दिलीप पाटील व नीलिमा आरज, महिला सेलच्या एपीआय थोरात आदी उपस्थित होते.
महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हा प्रकार रोखण्याकरिता आता पोलीस आयुक्तांनी पाऊल उचलले आहे. हे ‘दामिनी’ महिलांचे कमांडो पथक महिलांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असेल. या सात पथकांमध्ये २१ मुहिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही पथके महिलांची अत्याधिक वर्दळ असणाऱ्या ठिकाणी गस्त घालतील. कोणत्याही आपातकालीन स्थितीत महिलांना मदतीची गरज भासल्यास तत्काळ मदत देण्याकरिता ही पथके सज्ज राहतील.
समाजात महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, गरजेच्या वेळी त्यांना तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने दामिनी कमांडो पथक तयार करण्यात आले आहे. सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकींवरून ही पथके गस्त घालणार आहेत.
-दत्तात्रेय मंडलिक,
पोलीस आयुक्त