वडाळा शिवारात पाच हेक्टर पिकाचे नुकसान

By Admin | Updated: September 13, 2014 00:55 IST2014-09-13T00:55:07+5:302014-09-13T00:55:07+5:30

सिंचन विभागाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यात साकारलेल्या चांदी प्रकल्प परिसरात ये-जा करण्यासाठी ...

Damage to five hectares in Wadala Shivar | वडाळा शिवारात पाच हेक्टर पिकाचे नुकसान

वडाळा शिवारात पाच हेक्टर पिकाचे नुकसान

अमरावती : सिंचन विभागाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यात साकारलेल्या चांदी प्रकल्प परिसरात ये-जा करण्यासाठी नाल्यावर पूल तयार करण्याऐवजी छोटाशा रपटा बांधला. मात्र या रपट्यावरुन पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते नजिकच्या शेतात घुसले. परिणामी ेवडाळा शिवारातील सुषमा मुरादे यांच्या पाच हेक्टर पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.
अख्खे पीक वाहून गेल्याची तक्रार त्यांनी तहसिलदारांकडे केली आहे. सिंचन विभागाच्या अफलातून कारभाराने उभ्या पीकाचे नुकसान झाले असताना संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही.
गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना बराच दिलासा मिळाला असला तरी नदी , नाल्याच्या काठावरील पीकांची मोठी हानी झाल्याची बाब निर्दशनास आली आहे. या पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या हातून गेलेल्या पीकांना नवसंजिवनी मिळाली आहे. हे खरे असले तरी चांदी प्रकल्प परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मोठया नुकसानीचा सामना करावा लागला आहे. चांदी प्रकल्पात वडाळा व फत्तेपूर या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. प्रकल्प परिसरातून मुख्य मार्गावर ये-जा करताना खेकडा नामक मोठा नाला आहे. तथापि या नाल्यावर पूल बांधण्याऐवजी सिंचन विभागाने छोटासा रपटा तयार केला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी या रपट्यावरुन शेतशिवारात घुसले.
जोरात पाणी शिरल्याने शेताचा बांध फुटल्या गेला. यामध्ये सुषमा मुरादे यांच्या शेतातील पाच हेक्टरमधील सोयाबीन,कपाशी व तूर पीक वाहून गेले. झालेल्या पीक नुकसानीची माहिती सिंचन विभागाला देण्यात आली. मात्र या विभागाचा एकही अधिकारी पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले नाही, असा आरोप सुषमा मुरादे यांनी केला आहे. अचानक रपट्यावरुन वाहणारे पावसाचे पाणी जोरात शेतात शिरल्याने मोठा नालाच तयार झाला. त्यामुळे झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण करुन भरपाई मिळावी, यासाठी सुषमा मुरादे यांनी तहसिलदारांकडे धाव घेतली आहे. सिंचन विभागाने नाल्यावर पूल बांधण्याऐवजी रपटा बांधण्याची शक्कल लढविणाऱ्या अभियंत्याविरुद्ध मुख्यमंत्री, सिंचनमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Damage to five hectares in Wadala Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.