सुमित हरकुट चांदूरबाजारप्रजासत्ताक दिनी बेलोरा गावात आदर्श घडला. मंदिर, मशीद आणि बौद्ध विहारांवर तिरंगा डौलला. घराला कुलूप लावून सर्व ग्रामस्थ ग्रामसचिवालयासमोर एकत्र आले. तिरंग्याला सामूहिक मानवंदना दिली. देशभक्तीवर पोटतिडकीने बोलणारे, त्यासाठी राण उठविणारे, भगतसिंगांच्या जन्मगावी यात्रा काढणारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या तळमळीतून हा नजर लागावी, असा उपक्रम बेलोरा या त्यांच्या गावी साकारला गेला. ध्वजवंदनेच्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद विक्रमी होता.देशप्रेमाची सक्ती करण्याऐवजी मनामनात राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित करण्याकरिता आ. बच्चू कडू यांनी प्रजासत्ताक दिन सामूहिकरीत्या साजरा करण्याची संकल्पना बेलोरावासियांपुढे मांडली. त्यासाठी त्यांनी ‘जशी मनवता ईद दिवाळी, तशीच मनवा १५ आॅगस्ट अन् २६ जानेवारी’ हा मंत्र गावकऱ्यांना दिला. याच मंत्राच्या आधारे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना ध्वजारोहणाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यासाठी वाजत-गाजत प्रत्येक गावकाऱ्याच्या घरी जावून मानाची अक्षत दिली. याचा सकारात्मक परिणाम झाला. नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती संचारली. त्याचीच परिणीती म्हणून अख्खा गाव सामूहिक ध्वजारोहणाकरिता एकत्र आला. २१ सामूहिक ध्वजारोहणचांदूरबाजार : प्रजासत्ताकदिनी बेलोऱ्यात सुरूवातीला २१ ठिकाणी सामूहिक ध्वजारोहण करण्यात आले. यात मंदिर, मशीद, बुध्दविहारासह विविध चौकांमध्ये झेंडा फडकविण्यात आला. सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी जामा मशिदीमध्ये पहिला तिरंगा फडकला. येथे मो. शफी सौदागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर क्रमाक्रमाने बौध्दविहार, द्रोपदा विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, संकटमोचन हनुमान मंदिर, जयस्तंभ चौक तर इतर चौकात झेंडा फडकला. द्रोपदा विद्यालयात आ.बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पश्चात राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ गावातून रॅली काढण्यात आली. रॅलीत गावकरी, विद्यार्थ्यांनी विविध देखावे सादर केलेत. गावातील प्रत्येक घरासमोर व प्रमुख रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. प्रत्येक चौकात तसेच प्रत्येक धार्मिक स्थळी ध्वजारोहण करीत ही रॅली ग्रामसचिवालयात पोहोचली. या मुख्य कार्यक्रमस्थळी हजारोंच्या संख्येने गावकरी उपस्थित होते. यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. आमदारांच्या मातोश्री इंदीराबाई कडू यांचीही यावेळी उपस्थिती होती. उपस्थितांमध्ये आ. बच्चू कडू यांनी देशभक्तीची चेतना फुंकली. ग्रामसचिवालयात सरपंच स्वप्निल भोजने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याचवेळी दत्तमंदिर व शहीद भगतसिंह वाचनालयावरसुध्दा झेंडा फडकविण्यात आला. त्यानंतर अंध मुलांच्या देशभक्तीपर गीतांच्या आॅर्केस्ट्राचे आयोजनही करण्यात आले होते. तिरंगा दौड, रांगोळी स्पर्धा, तसेच लकी ड्रॉने कार्यक्रमात रंगत आणली. ग्रामपंचायतच्यावतीने घरोघरी लाडूंचे वाटप करण्यात आले. आ.बच्चू कडू यांच्या पुढाकाराने पार पडलेला हा राष्ट्रीय सण सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. बेलोऱ्यात पेटलेली देशभक्तीची ही ठिणगी देशभरात ज्वाला व्हावी, अशी भावना या आयोजनामागे असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
बेलोऱ्यात मंदिर, मशीद, बौद्धविहारांवर डौलला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2016 00:11 IST