सेतू नागरी केंद्रात ‘दलालराज’

By Admin | Updated: January 12, 2017 00:07 IST2017-01-12T00:07:40+5:302017-01-12T00:07:40+5:30

महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी सुरु केलेल्या सेतू नागरी सुविधाकेंद्रातील ‘दलालराज’चा भंडाफोड तहसीलदारांच्या पुढाकाराने बुधवारी करण्यात आला.

'Dalalaj' at Setu Civil Center | सेतू नागरी केंद्रात ‘दलालराज’

सेतू नागरी केंद्रात ‘दलालराज’

फेरफारासाठी मागितले पैसे : पोलिसांनी नोंदविले दोघांचे बयाण
अमरावती : महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी सुरु केलेल्या सेतू नागरी सुविधाकेंद्रातील ‘दलालराज’चा भंडाफोड तहसीलदारांच्या पुढाकाराने बुधवारी करण्यात आला. प्रॉपर्टी कार्ड, फेरफार करण्यासाठी १५ हजारांची मागणी करणाऱ्या दोघांचे बयाण कोतवाली पोलिसांनी नोंदविले असून या सेतू केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महसूल विभागाने सेतू नागरी सुविधाकेंद्र विविध संस्थांना चालविण्यासाठी दिले आहेत. याकेंद्रात विविध कामांसाठी आकारले जाणारे शुल्क महसूल विभागाने निश्चित केले आहे. मात्र, काही सेतू केंद्रांच्या संचालकांनी याकेंद्रांना कमाईचे साधन बनविले आहे. याकेंद्रांमध्ये नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केले जात असून त्यासाठी दलालही सक्रिय झाले आहेत.

सेतू केंद्र कर्मचाऱ्याशी वाद
अमरावती : एमआयडीसी मार्गावरील सेतू केंद्रात सक्रिय अशाच एका दलालाने अंजनगाव बारी येथील अमोल कदम यांना प्रॉपर्टी कार्ड, फेरफार करून देण्यासाठी १५ हजारांची मागणी केली होती. त्यानुसार कदम यांनी १३ हजार ५०० रुपये देण्याचे निश्चित केले. प्रॉपर्टी कार्ड, फेरफारसाठी आवश्यक कागदपत्रे देताना अमोल कदम यांनी सेतू केंद्रातील दलालांना ९ हजार ५०० रुपये दिले. तरी सुद्धा निर्धारित वेळेत फेरफार झाले नाही. त्यामुळे अमोल कदम हे सेतू केंद्रात विचारणा करण्यासाठी वारंवार गेलेत. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. महसूल अधिकाऱ्यांना कामासाठी पैसे देण्यात आले असून लवकरच काम होईल, असेही कदम यांना सांगण्यात आले. परंतु पैसे देऊनही काम होत नसल्याचे बघून अमोल कदम यांनी तहसीलदार सुरेश बगळे यांच्याकडे धाव घेतली. तहसीलदारांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर तहसीलदार बगळे यांनी एमआयडीसी सेतूकेंद्राच्या संचालकांना बोलावून अमोल कदम यांच्याकडून प्रॉपर्टी फेरफारसाठी घेतलेले ९ हजार ५०० रूपये परत देण्यास सांगितले. मात्र कर्मचाऱ्यांनी पैसे घेतलेच नसल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर तहसीलदार सुरेश बगळे यांच्याशी सुद्धा सेतू केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वाद घातला. अखेर तहसीलदाराने सिटी कोतवाली पोलिसांना पाचारण केले. सेतू केंद्राचे मंगेश गुल्हाने यांचे बयाण पोलिसांनी नोंदविले. हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच सेतू केंद्राच्या संचालकांनी माघार घेत अमोल कदम यांच्याकडून घेतलेले पैसे परत देण्याची तयारी दर्शविली. दरम्यान तहसीलदार सुरेश बगळे यांनी एमआयडीसीतील सेतू केंद्राचे कामकाज ‘ब्लॉक’ करण्याची कारवाई केली.

सेतू केंद्रात अतिरिक्त पैसे घेतल्यास तक्रार नोंदवा
सेतू केंद्रात नागरिकांकडून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे. सेतू केंद्रात विविध कामांसाठीचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास सेतू केंद्रांच्या संचालकांविरूद्ध तक्रार नोंदविण्याचे आवाहन तहसीलदार सुरेश बगळे यांनी केले आहे. शुल्कासंदर्भातील फलक लावण्याच्या सूचना सेतू केंद्रांना देण्यात आल्या आहेत.

सेतू केंद्रात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत. एमआयडीसी सेतू केंद्राचे प्रकरण समोर आले. केंद्र सील करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेताच केंद्र संचालकांनी पैसे परत केले.
- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती

Web Title: 'Dalalaj' at Setu Civil Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.