आरटीओत पुन्हा ‘दलालराज’
By Admin | Updated: October 12, 2015 00:32 IST2015-10-12T00:32:49+5:302015-10-12T00:32:49+5:30
अगदी अर्ज उपलब्धतेपासून ते भरण्यापर्यंतची योग्य माहिती नागरिकांना मिळत नसल्याने कोणतेही काम असो ‘एजंटविना कागद हलेना’ ...

आरटीओत पुन्हा ‘दलालराज’
पहिले पाढे पंचावन्न : अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण मौन, सर्वसामान्यांची होतेय लूट
प्रदीप भाकरे अमरावती
अगदी अर्ज उपलब्धतेपासून ते भरण्यापर्यंतची योग्य माहिती नागरिकांना मिळत नसल्याने कोणतेही काम असो ‘एजंटविना कागद हलेना’ अशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थिती आहे. जानेवारी २०१५ मधील काही दिवस वगळता आता पुन्हा एकदा आरटीओची स्थिती ‘दलालयुक्त’ झाली आहे.
राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये दलालयुक्त करण्याचा आदेश तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी जानेवारी २०१५ मध्ये दिला होता. त्यानंतर काही ठिकाणी अगदी पोलीस बंदोबस्तात एजंटसना आरटीओमधून बाहेर काढण्यात आले. मात्र त्याविरुद्ध एजंटच्या संघटना उच्च न्यायालयात गेल्या. दरम्यानच्या काळात राज्यातील सर्व आरटीओंची स्थिती ‘पहिले पाढे पंचावन्न’ झाली. आज येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठलेही काम एजंट वा दलालाविना होत नाही.
अगदी प्रवेशद्वारापासून ससेमिरा
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाय ठेवताच नागरिकांच्या पाठीमागे दलालांचा ससेमिरा लागतो. प्रत्येक कामाचे दर न विचारताही सांगितले जातात. सर्व संगणकीकरण आणि आॅनलाईन प्रक्रिया असताना वाहनचालक आणि काम करण्यास आलेल्या नागरिकांना अधिक मेहनताना घेऊन लुबाडले जाते.
दलालामार्फत गेल्यास तुमचे काम लवकर होते. मात्र तेच काम वाहनधारक स्वत: करायला गेल्यास जाणूनबुजून उशीर केला जातो, असा येथील अनुभव आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दुसऱ्या माळ्यावर विविध प्रकारची कामे खिडक्यांवरून केली जाते. खिडक्यांवर नागरिकांची रांग असताना आतून मात्र दलाल आपले काम बिनदिक्कतपणे करून निघून जातात. एकंदरीतच प्रादेशिक परिवहन कार्यालय आता दलालयुक्त झाल्याचा अनुभव पदोपदी येतो. त्यावर कुठल्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण उरलेले नाही. ३० रुपयांच्या शिकाऊ परवान्यासाठी २०० रूपये आकारले जातात. उल्लेखनीय म्हणजे त्यासाठी संबंधित वाहन चालकालाच आॅनलाईन प्रक्रिया करावी लागते. तरीही येथे काम लवकर करून देण्याच्या नावावर मोठी रक्कम उकळली जाते.
येथे कार्यालयाबाहेर असो की आत गर्दी दलालांची असते. या सर्व फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष चालविल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झालेला आहे.
या संपूर्ण कार्यालयात एजंट वा दलाल हाती कागदे घेवून मुक्तसंचार करीत असतात. २३ खिडक्यांच्या सभोवताली त्यांचेच राज्य असल्याचे आज पुन्हा एकदा प्रत्ययास आले.
वर्षानुवर्ष अनुभव घेवून थकलेल्या नागरिकांकडूनही या वर्षानुवर्षाच्या अनुभवावरून कागद हलवायचा असेल तर एजंटाकडे जा, अशी सर्वसामान्यांची दृढ मानसिकता बनली आहे. स्वत:हून खिडक्यांवर विचारत अर्ज भरला तरी कोणतीही त्रुटी न काढता आपला अर्ज स्वीकारला जाईल, तसेच आपले काम लवकर पूर्ण होईल याची सर्वसामान्य नागरिकांना शाश्वती उरलेली नाही आणि त्यामुळेच ५० रुपयांच्या कामासाठी नागरिकांना ५०० रूपये मोजावे लागत आहे.
फक्त तिघांना मान्यता
अगदी प्रवेशद्वारापासून सुरू झालेला दलालांचा ससेमिरा प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातील वरच्या मजल्यावरील खिडक्यांपर्यंत सुरू राहतो. यातही ‘भाव’ केले जातात. अर्ज भरून देण्यासाठी फक्त तीन व्यक्तींची अधिकृत नेमणूक केली असताना हे तिघे वगळता येथे शेकडो दलालांची उठ-बैस सारखी सुरू असते. गौतम सोनाजी मेश्राम, गजानन राजाराम मसराम आणि राजकुमार माधवराव तायडे अशी मान्यताप्राप्त अर्ज भरणाऱ्या व्यक्तीचे नावे असून त्यांचे अर्ज भरण्याचे शुल्क केवळ ५ आणि १० रुपये आहे. वरील तिघांचा या कार्यालयात शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाहीत.