आयुक्त रजेवरुन येताच सात संकुलांवर दणका
By Admin | Updated: May 28, 2015 00:21 IST2015-05-28T00:21:05+5:302015-05-28T00:21:05+5:30
नियमबाह्य बांधकाम आणि वाहनतळाची जागा गिळंकृत करणाऱ्या सात प्रतिष्ठानांचे अतिक्रमण महापालिका आयुक्त ....

आयुक्त रजेवरुन येताच सात संकुलांवर दणका
नोटीस बजावली : संकुलधारकांना स्वत: पाडण्याच्या सूचना
अमरावती: नियमबाह्य बांधकाम आणि वाहनतळाची जागा गिळंकृत करणाऱ्या सात प्रतिष्ठानांचे अतिक्रमण महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे रजेवरुन परतल्यानंतर पाडले जाणार आहे. त्यानुसार संबंधित प्रतिष्ठांनाना नोटीस बजावून १५ दिवसांत हे अतिक्रमण पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे अतिक्रमण नियमित होऊ नये, यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नागरिकांना सोईसुविधा मिळण्यासह शहरातील रस्त्यांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सहाय्यक संचालक नगर रचना विभाग सुरेंद्र कांबळे यांना आयुक्तांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून अतिक्रमीत संकुलासंदर्भाची माहिती जाणून घेतली आहे.
२२ मे रोजी अतिक्रमित संकुलधारकांना नोटीस बजावून ते स्वत: पाडण्याचे आदेश दिले आहेत. संकुलधारकानी स्वत: पाडले नाही तर आयुक्त गुडेवार हे स्वत: उभे राहून ते अतिक्रमण जमिनदोस्त करतील, असे संकेत आहे. स्थानिक जयस्तंभ ते सरोज चौक मार्गावरील बालाजी मार्केट, नमुना येथील चुन्नू-मुन्नू, रेल्वेस्टेशन चौकातील ईगल रेस्टारंट, बडनेरा मार्गावरील राजकमल चौक नजिकचे मुंशी कॉम्प्लेक्स, खत्री कॉम्प्लेक्स, राजकमल चौक ते अंबादेवी मार्गावरील टांक प्लाझा तर मध्यवर्ती बसस्थानक मार्गावरील रामगिरी हॉटेल या प्रतिष्ठानच्या संचालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. अतिक्रमण १५ दिवसात पाडण्याचे आदेश आहेत.
विना देयकांचा माल ट्रकसह जप्त
स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाने महापलिका सीमेत विनादेयकाचे ४१ पोते नमकिनचा माल येत असल्याने तो जप्त करण्यात आला आहे. एम. एच. ३१- सीक्यू २४६९ या क्रमाकांचा ट्रक भरारी पथकाने ताब्यात घेतला आहे. सदर माल नांदगाव पेठ येथील फॅक्टरीतून येत आल्याची माहिती उपायुक्त विनायक औगड यांनी दिली.