विदर्भाच्या नंदनवनात दिवसाआड पाणीपुरवठा
By Admin | Updated: June 30, 2017 00:11 IST2017-06-30T00:11:08+5:302017-06-30T00:11:08+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर मागील १५ दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

विदर्भाच्या नंदनवनात दिवसाआड पाणीपुरवठा
पावसाळ्यातही पाणीटंचाई : १२ गावांना ७ टँकरने पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर मागील १५ दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. येथील सक्कर तलाव आणि कालापाणी तलावाला बुड लागल्याने पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. तालुक्यातील १२ गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे चित्र आहे.
चिखलदरा पर्यटन स्थळासाठी गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित पर्यटन महोत्सवात साडेपाचशे कोटी रूपयांचा निधी सिडको विकासासाठी देण्याचे जाहीर केले होते. मात्र वर्ष लोटूनसुद्धा विकासाचा घोडा अडल्याचे चित्र आहे. सिडकोमार्फत चिखलदरा पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध भीमकुंड पॉर्इंटवरील बरमासत्ती नदीवर पाणी साठवण प्रकल्पाचा प्रस्ताव पारित केलेला आहे. मागील दहा वर्षांपासून पर्यटन स्थळ पाण्याविना व्याकुळ असताना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अजूनही सुरूवात झालेली नाही. परिणामी सिडकोचा विकास पांढरा हत्ती ठरला आहे.
येथील कालापाणी व सकुर तलावामधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र हे दोन्ही तलाव हिवाळ्यातच कोरडे पडू लागतात, परिणामी सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी येथून शहराला पाणीपुरवठा होतो.