दैनंदिन साफसफाईचे कंत्राट संस्थांऐवजी कंपनीला !
By Admin | Updated: March 6, 2017 00:05 IST2017-03-06T00:05:20+5:302017-03-06T00:05:20+5:30
शहरातील दैनंदिन साफसफाईचे कंत्राट वेगवेगळ्या २२ कं त्राटदार वजा एजंसीला न देता ....

दैनंदिन साफसफाईचे कंत्राट संस्थांऐवजी कंपनीला !
नवा निर्णय विचाराधीन : साखळी तोडण्यासाठीचे पाऊल, कंत्राटदारांमध्ये खळबळ
प्रदीप भाकरे अमरावती
शहरातील दैनंदिन साफसफाईचे कंत्राट वेगवेगळ्या २२ कं त्राटदार वजा एजंसीला न देता त्यासाठी एकाच नामांकित कंपनीला पाचारण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. राष्ट्रीय स्तरावर निविदा प्रक्रिया राबवून मल्टिनॅशनल कंपनीकडे शहर स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी सोपविण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या एकाच कंपनीकडे हे काम दिल्यास स्वच्छतेबाबतची ओरड थांबेल आणि नामांकित कंपनीवर जबाबदारी निश्चित करणे शक्यदेखील होईल, असा महापालिका प्रशासनाचा होरा आहे. तथापि हा एकांगी प्रस्ताव सभागृहाच्या पचनी पडणार नाही, अशी भीतीही प्रशासनातील काही धुरिणांनी व्यक्त केली आहे. ९ मार्चला नवे सत्ताधीश पदारुढ झाल्यानंतर या नव्या निर्णयावर चर्चा अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे महापालिका क्षेत्रातील साफसफाईवर वर्षाकाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्च होतात. याशिवाय महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या सुमारे ७०० स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च धरल्यास हा आकडा तब्बल २५ कोटींवर जाऊन पोहोचतो. महापालिकेच्या स्वच्छता कंत्राटावर अक्षरश: उड्या पडतात. महापालिकेच्या स्थापनेपासून कमी अधिक प्रमाणात त्याच चेहऱ्यांना कंत्राट दिली जातात. त्यासाठी प्रचंड अर्थकारण साधले जाते. त्यापार्श्वभूमिवर २२ प्रभागातील साफसफाईसाठी एकच कंपनी विचाराधीन असल्याने प्रभागनिहाय कंत्राट घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडण्याचे संकेत आहेत. साफसफाई कंत्राटाच्या माध्यमातून वर्षोनुवर्षे अनेकांचे चांगभले होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सभागृहात एकाच कंपनीचा प्रस्ताव कितपत टिकाव धरेल, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे.
निविदा प्रक्रिया अडचणीत
अमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच ४३ प्रभागांतील स्वच्छतेचे कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने २२ प्रभागासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र ही प्रक्रिया आचारसंहितेत अडकल्याने जुन्याच कंत्राटदारांना तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली. निवडणूक संपल्यानंतर नव्याने निविदा प्रक्रियेने वेग घेतला असताना साफसफाईचे कंत्राट एकाच कंपनीला देण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे.त्यामुळे विद्यमान परिस्थितीत सुरु असलेली निविदा प्रक्रिया अडचणीत आली आहे.
जुन्यांना फॉलोआॅन की नव्याने ई-निविदा
महापालिका निवडणुकीपूर्वी दैनंदिन साफसफाईसाठी ई-निविदा प्रक्रिया राबािण्यात आली. यात २२ प्रभागांपैकी १६ प्रभागांसाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक निविदा प्राप्त झाल्यात, तर उर्वरित सहा प्रभागांसाठी निविदा न आल्याने त्या प्रभागासाठी नव्याने निविदा प्रक्रिया करावी लागणार आहे. या पार्श्वभूमिवर अंतिम टप्प्यात पोहोचलेली निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल की, प्रभागनिहाय प्रत्येकी एक या कंत्राटदार या पद्धतीला फाटा देऊन एकाच कंपनीकडे शहर स्वच्छतेचे काम देण्यासाठी देशपातळीवरुन निविदा मागविण्यात येतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रभागनिहाय २२ वेगवेगळ्या कंत्राटदारांऐवजी शहर स्वच्छतेची जबाबदारी राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या एकाच कंपनीला देण्याची बाब विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येईल.
- हेमंतकुमार पवार,
आयुक्त ,महापालिका