बाबा, आम्ही पडक्या शाळेत जाणार नाही!
By Admin | Updated: June 28, 2015 00:31 IST2015-06-28T00:31:05+5:302015-06-28T00:31:05+5:30
एकीकडे जिल्हाभरात नवागत विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ शासनाच्या आदेशान्वये उत्साहात साजरा करण्यात आला.

बाबा, आम्ही पडक्या शाळेत जाणार नाही!
विद्यार्थ्यांचा पवित्रा : असदपूरच्या जि.प. उर्दू शाळेवर बहिष्कार, जीर्ण इमारत, अव्यवस्था
विश्वास चऱ्हाटे असदपूर
एकीकडे जिल्हाभरात नवागत विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ शासनाच्या आदेशान्वये उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु असदपूर येथील ऊर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील ‘स्वागत’ नाकारून चक्क शाळेवर बहिष्कार टाकला. पडक्या, नादुरूस्त आणि सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या शाळेत आम्ही कदापि शिक्षण घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस या विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला नाही.
असदपूर येते जि.प.ची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची ऊर्दू शाळा आहे. विद्यार्थी संख्याही बरीच आहे. परंतु या शाळेची इमारत जीर्ण झाली असून ती केव्हाही कोसळू शकते. शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत. छप्पर ठिकठिकाणी गळते. गत वर्षी १६ आॅगस्ट रोजी या शाळेची मोठी भिंत कोसळली होती. त्यावेळी सुदैवाने प्राणहानी टळली. मात्र, त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली नाही. या शाळेची अवस्था अद्यापही सुधारलेली नाही. ही भिंत कोसळण्यापूर्वीसुध्दा शाळा व्यवस्थापन समितीने संबंधित विभागाला निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. मागील तीन वर्षांपासून पालक व विद्यार्थी शिक्षण विभागाला आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहेत. शेवटी पालक व विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. २६ जून रोजी शालेय सत्राच्या पहिल्या दिवशी एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही. पडक्या शाळेत आमची मुले पाठवून आम्ही त्यांच्या जीवाला धोका पोहोचविणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.