‘डी-मार्ट’ची ग्राहक हक्कांवर गदा
By Admin | Updated: October 21, 2015 00:27 IST2015-10-21T00:27:01+5:302015-10-21T00:27:01+5:30
कॅम्प स्थित ‘डी-मार्ट’मधून तूर डाळ खरेदीवर आणली गेलेली मर्यादा ग्राहक हक्कांवर गदा आणणारी आहे.

‘डी-मार्ट’ची ग्राहक हक्कांवर गदा
साठेबाजांवर निर्बंध : पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी
अमरावती : कॅम्प स्थित ‘डी-मार्ट’मधून तूर डाळ खरेदीवर आणली गेलेली मर्यादा ग्राहक हक्कांवर गदा आणणारी आहे. तूर डाळीचे भाव दरदिवशी वाढत असल्याने प्रतिग्राहक फक्त दोन किलो डाळीची मर्यादा ‘डी-मार्टने’ घालून दिली आहे. ग्राहकाला अधिक डाळ हवी असल्यास ती कशासाठी?, याचा ठोस पुरावा दाखविण्याची मागणी होत आहे. एखाद्या ग्राहकाने ‘डी -मार्ट’मधून पाच किलो तूर डाळ खरेदी केल्यास काऊंटरवर त्यातून तीन किलो डाळ परत घेतली जात आहे. ग्राहकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या ‘डी-मार्ट’च्या या जावईशोधाने ग्राहकांची मात्र कुचंबणा होत आहे. बाजारभावापेक्षा कमी किमतीत डाळ उपलब्ध होत असल्याने अनेकांनी डी-मार्टमध्ये खरेदीस पसंती दिली असताना तूर डाळीच्या खरेदीवर घातलेली मर्यादा संतापजनक आहे. आजही या स्टोअरमधून ग्राहकाला फक्त २ किलो तूर डाळ खरेदीची मुभा देण्यात आली. वरिष्ठांचे तसे आदेश असल्याचे स्टोअर मॅनेजर सुशांत चिद्दरवार यांनी सांगितले.
दसरा, दिवाळी जवळ आली असताना डाळीचे दर गगनाला भिडले आहेत. वर्षभरात तूर डाळीच दर जवळपास अडीच पट तर इतर डाळींचे दर दुप्पट झाले आहेत. मंगळवारी किरकोळ बाजारात तूर डाळ २०० ते २२५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होती. डाळीच्या चढत्या दरामागे साठेबाजी हा सर्वात मोठा ‘फॅक्टर’ असल्याचे बोलले जाते. उल्लेखनीय म्हणजे ग्राहकांनी २ किलो तूर डाळ खरेदी करायची की १० किलो अशी मर्यादा घालता येणार नाही, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)