दत्तापुरात सिलिंडरचा स्फोट
By Admin | Updated: May 15, 2014 23:04 IST2014-05-15T23:04:27+5:302014-05-15T23:04:27+5:30
दुपारी घरात स्वयंपाक तयार करीत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला आणि घरातील सर्वच संसारउपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली.

दत्तापुरात सिलिंडरचा स्फोट
अमरावती : दुपारी घरात स्वयंपाक तयार करीत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला आणि घरातील सर्वच संसारउपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली. दैव बलवत्तर म्हणून दाम्पत्याचे प्राण वाचले. ही घटना गुरुवारी दुपारी जुना दत्तापूर शहरात घडली. धामणगाव शहराच्या दक्षिण भागात दत्तापूर परिसरात संदीप यादव यांचे घर आहे. त्यांची पत्नी दुपारी बारा वाजता घरी स्वयंपाक करीत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. घरात असलेले गहू, तांदूळ, संसारउपयोगी साहित्याची पूर्णत: राखरांगोळी झाली. घरातील टीव्ही, लोखंडी कपाटातील कपडे, पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आगीत वितळले. हातावर आणून पानावर खाणार्या या गरीब कुटुंबाने आलमारीत दहा हजार रूपये ठेवले होते. ही रक्कम या आगीत पूर्ण जळून गेली. अंगावरील कपड्यांशिवाय या कुटुंबाजवळ काहीच शिल्लक राहिले नाहीत. सिलिंडरच्या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक भयभीत झाले. घरात आगीचा भडका दिसताच या दाम्पत्याने आपले प्राण वाचवीत बाहेर आलेत. घटनेची माहिती बाजार समितीचे सभापती श्रीकांत गावंडे व न.प.सदस्य चंदू डहाणे यांनी नगर परिषदेच्या अग्नीशमन विभागाला दिली. अग्नीशमन विभागाचे प्रमुख अशोक पाठक, नंदू हांडे, हेमंत कापसे यांनी आग विझविण्यात यश मिळविले. घरातील सर्वच साहित्य जळले व गरीब कुटूंब असल्याने प्रशासनाने त्वरित या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी श्रीकांत गावंडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)