तळेगाव ठाकूर येथे सिलिंडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:30+5:302021-03-28T04:12:30+5:30
पान २ ची लिड इलेक्ट्रॉनिक वस्तू, धान्य, रोख रक्कम जळून खाक तळेगाव ठाकूर : तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील ...

तळेगाव ठाकूर येथे सिलिंडरचा स्फोट
पान २ ची लिड
इलेक्ट्रॉनिक वस्तू, धान्य, रोख रक्कम जळून खाक
तळेगाव ठाकूर : तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील एका घरात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. २६ मार्च रोजी पहाटे ४ च्या सुमारास संपूर्ण कुटुंबीय गाढ झोपेत असताना अचानक सिलेंडरने पेट घेतला आणि काही वेळातच पेटलेल्या सिलिंडरचा भयंकर स्फोट झाला. त्यामुळे घरातील वस्तू, धान्य आणि रोख रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घराचा काही भागदेखील आगीने कवेत घेतला. प्रभाकर उत्तमराव गोमासे यांच्या घरात ही घटना घडली.
तळेगाव ठाकूर येथील वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये प्रभाकर उत्तमराव गोमासे हे पत्नी पुष्पा, मुलगा प्रशांत, सून शालू प्रशांत गोमासे, नात दुर्गा व नातू प्रतीक रमेश तुमसरे यांच्यासोबत राहतात. पहाटे पुष्पा प्रभाकर गोमासे यांना सिलिंडरने पेट घेतल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली. पाणी टाकून सिलिंडर विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो प्रयत्न निष्फळ ठरला आणि काही क्षणातच सिलिंडरचा प्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे घरातील टीव्ही, मिक्सर तसेच सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्यात त्याचबरोबर घरातील गहू, तूर, चणा, तांदूळ, कपडे, भांडी संपूर्ण बेचिराख झाले. ६० हजार रुपयेदेखील जळून खाक झाले. या घटनेत दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर स्फोटामुळे आर्थिक नुकसान झाले तरी जीवित हानी टळली. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
कुटुंब उघड्यावर
सिलिंडरच्या भीषण स्फोटामुळे घरातील सर्व साहित्य तसेच संपूर्ण घर जळाल्यामुळे गोमासे कुटुंबाची वाताहत झाली आहे. कुटुंब उघड्यावर आले आहे. मजुरीवर चरितार्थ चालविणाऱ्या या कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता जळाल्यामुळे जगावे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. घटनास्थळाला तळेगाव ठाकूर येथील सरपंच दर्शना मारबदे, उपसरपंच सतीश पारधी यांनी भेट दिली. सदर कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
--------