गॅस कटरने खिडक्या कापून धाडसी घरफोडी
By Admin | Updated: June 21, 2014 23:47 IST2014-06-21T23:47:02+5:302014-06-21T23:47:02+5:30
फरशी स्टॉप परिसरात वृद्ध महिलेचा गळा आवळून दागिने चोरीच्या घटनेचे शहारे अमरावतीकरांच्या अंगावर कायम असतानाच शुक्रवारी मध्यरात्री शारदा नगरात झालेल्या आणखी एका धाडसी चोरीमुळे

गॅस कटरने खिडक्या कापून धाडसी घरफोडी
अमरावती : फरशी स्टॉप परिसरात वृद्ध महिलेचा गळा आवळून दागिने चोरीच्या घटनेचे शहारे अमरावतीकरांच्या अंगावर कायम असतानाच शुक्रवारी मध्यरात्री शारदा नगरात झालेल्या आणखी एका धाडसी चोरीमुळे अमरावतीकर कमालीचे धास्तावले आहेत. या चोरीमध्ये सुुमारे दोन लाखापर्यंतचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्यार्तंगत येणाऱ्या शारदा नगरात घरफोडीची घटना उघडकीस आली. या घटनेने कसेनुसे झालेल्या पोलीसांची एकच तारांबळ उडाली.
शारदा नगर येथील रहिवासी संतोष श्रीवल्लभ चांडक (५०) हे १८ तारखेपासून लग्न समारंभाकरिता राजस्थान येथे गेले आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांचा वाहनचालक राहुल हा घराच्या आवारातील झाडांना पाणी घालण्याकरिता आला असता त्याला घरातील खिडक्या तुटलेल्या दिसल्या. त्याने लगेच याबाबत चांडक यांचे नातेवाईक राजेन्द्र धनशाम सोनी यांना माहिती दिली. सोनी यांनी घटनेची शहनिशा करुन राजापेठ पोलीसानां घटनेची वर्दी दिली. लागलीच पोलीस चांडक यांच्या घरी दाखल झाले. पंचनामा करुन श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने बारकाव्यांचा शोध घेतला.