राकाँच्या दगाफटक्यामुळे भातकुली सेनेच्या ताब्यात

By Admin | Updated: September 17, 2014 23:29 IST2014-09-17T23:29:11+5:302014-09-17T23:29:11+5:30

रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजिज पटेल यांनी काँग्रेसला दगा दिल्यामुळे भातकुली पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती विराजमान झाला.

In the custody of the Bhatkuli Sena, | राकाँच्या दगाफटक्यामुळे भातकुली सेनेच्या ताब्यात

राकाँच्या दगाफटक्यामुळे भातकुली सेनेच्या ताब्यात

गणेश वासनिक - अमरावती
रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजिज पटेल यांनी काँग्रेसला दगा दिल्यामुळे भातकुली पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती विराजमान झाला. त्यामुळे आघाडीचा परंपरागत शत्रूपक्ष असलेल्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेचा वाटा देण्यासाठी केवळ राष्ट्रवादीच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
भातकुली पंचायत समितीत काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी व युवा स्वाभिमान संघटनेचे प्रत्येकी एक अशा पाच सदस्यांच्या भरवशावर यापूर्वी सत्ता वाटपाचे सूत्र ठरविण्यात आले. त्यानुसार गतवेळी सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या इंदू कडू सभापती तर राष्ट्रवादीचे अजिज पटेल यांना अडीच वर्षांसाठी उपसभापतीपद मिळाले. सत्तेचे हे सूत्र ठरविताना पुढील निवडणुकीत सभापतीपद काँग्रेसला तर उपसभापतीपद युवा स्वाभिमान संघटनेला देण्याचा निर्णय झाला. मात्र, रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजिज पटेल यांनी पुन्हा उपसभापतीपदावर डोळा ठेवत चक्क शिवसेनेशी हातमिळवणी केली. सभापती, उपसभापतीपदासाठी समसमान मते असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वरचिठ्ठीव्दारे निकाल लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ईश्वरचिठ्ठीने शिवसेनेच्या सुनीता वानखडे सभापती तर युवा स्वाभीमानच्या संगीता चुनकीकर या उपसभापती झाल्यात. मागील निवडणुकीत झालेल्या करारानुसार अजिज पटेल यांनी शब्द पाळणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सत्तेसाठी अभद्र हातमिळवणी करुन काँग्रेसचा विश्वासघात केला, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. अजिज पटेल यांनी उपसभापतीपदासाठी शिवसेनेशी हातमिळवणी केली असली तरी त्यांचे मनसुबे निसर्गालाही मान्य नव्हते, त्यामुळे ईश्वरचिठ्ठीदेखील त्यांच्या कामी आली नाही, असे निकालाअंती स्पष्ट झाले आहे. एकीकडे अजिज पटेल यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली असताना उपसभापतीपदासाठी काँग्रेसने अल्पसंख्याक व्यक्तीला दूर ठेवले, असा आरोप अजिज पटेल आता करीत आहेत. ऐनवेळी सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्यामुळे अजिज पटेल यांचा तीळपापड झाला आहे.

Web Title: In the custody of the Bhatkuli Sena,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.