सद्गुणांच्या पाठीशी उभी ठाकली संस्कृती !

By Admin | Updated: May 14, 2016 00:02 IST2016-05-14T00:02:49+5:302016-05-14T00:02:49+5:30

शांत अमरावतीत शुक्रवारी लहर उठली. प्रामाणिकतेचे मूर्तिमंत उदाहरण असलेले अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीला विरोध करण्यासाठी ....

Culture of Thakli standing behind the virtues! | सद्गुणांच्या पाठीशी उभी ठाकली संस्कृती !

सद्गुणांच्या पाठीशी उभी ठाकली संस्कृती !


लोकमत प्रासंगिक
- गणेश देशमुख


शांत अमरावतीत शुक्रवारी लहर उठली. प्रामाणिकतेचे मूर्तिमंत उदाहरण असलेले अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीला विरोध करण्यासाठी सरसावलेल्या अमरावतीकरांच्या आत्मक्लेशाची ती लहर होती. कातडी जाळणाऱ्या उन्हात पुरुषांच्या बरोबरीने महिला, मुले, मुली, ज्येष्ठ नागरीक आणि अपंगांनीही बदलीला विरोध करणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग दर्शविला. तीन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी केली.
गुरुवारी सायंकाळी गुडेवार यांची बदली झाल्याची अधिकृत वार्ता महापालिकेत मंत्रालयातून धडकली. साऱ्यांच्याच नजरा फॅक्सकडे लागल्या होत्या. फॅक्स आला की, गुडेवार जाणार, हे निश्चित होते. गुडेवारांनी निवासस्थानी आवश्यक त्या फाईली हातावेगळ्या करण्यासाठी बोलवून घेतल्या होत्या. बदली झाली; आदेशाची प्रतीक्षा तेवढी असल्याचे महापालिका कार्यालयातून सांगण्यात आले होते. बदलीचे संकेत मंत्रालयातून दिले गेले होते, त्यामुळेच हे सारे घडले होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतरही गुडेवारांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या चाहत्यांची गर्दी जमलेली होती. शहराप्रती आस्था ठेवणारी मंडळी शुक्रवारी सकाळपासूनच राजकमल चौकात एकत्रित आली. गुडेवारांची बदली आम्ही होऊच देणार नाही, असा निर्धार तेथे करण्यात आला. दिवसभर हा लोकरेटा कायम होता. घाई झाल्यामुळे शुक्रवारी शहर बंद करण्याऐवजी शनिवारी बंद पुकारण्याचा निर्णय झाला. घोषणा झाली. दहा हजार पत्रके शहरभर वाटली गेलीत. हे सारे सुरू असताना अनेकांनी मुख्यमंत्र्यांना फॅक्सद्वारे त्यांची भावना कळविली. गुडेवार आम्हाला हवे आहेत, या अशायाची अनेक निवदने, पत्रे सीएमओला पाठविण्यात आलीत. आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभीमान संघटनेने दुपारी गुडेवारांच्या बदली स्थगितीसाठी रॅली काढली. शहरात आज दिवसभर स्पंदने जाणवत होती. एका अधिकाऱ्याचा मुक्काम वाढावा म्हणून शहर कसे जीवंत झाले होते. अमरावती शहराच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते. अधिकाऱ्यासाठी लोकांची हृदये धडकत होती. चांगुलपणावर विश्वास ठेवणारी, प्रेम करणारी मंडळी अमरावतीत आहेत, हेच आज पुन्हा सप्रमाण सिद्ध झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत अच्च्युत महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख, दाजीसाहेब पटवर्धन, दादासाहेब खापर्डे, अंबादासपंत वैद्य, सुदामकाका देशमुख, बी.टी.देशमुख- कर्तृत्त्वाच्या नभात चकाकणारी ही रत्ने ज्या जिल्ह्याच्या मातीत घडलीत, त्या मातीत जगणारा सामान्य माणूसही तसाच आहे- संवेदनशील अन् सुगंधी, हे आज जगाला बघता आले. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अशी भूषणावह बिरुदावली मिरवणाऱ्या इंद्रपुरीच्या शानशौकतीत आजच्या उत्स्फूर्त लोकलढ्याने चार चांद लागले!
गुडेवार- कोण, कुठले? काय नाते अंबानगरीशी त्यांचे? आले काय नि गेले काय? असाही विचार होऊ शकला असता; पण माणूस बघून प्रेम करणारा, स्वार्थ बघून जीव लावणारा हा जिल्हा नाही. चांगुलपणावर जीवन उधळणारा हा जिल्हा! गुडेवार हे चांगुलपणाचे, प्रामाणिकपणाचे, कर्तव्यकठोरतेचे चालते-बोलते उदाहरण. जगभर फिरलो तरी या शहरातील स्मशानातच आम्ही विसावणार आहोत, हा विचार अमरावतीवासियांचा. गुडेवारांच्या पाठीशी उभा ठाकलेला लोकरेटा अर्थात् सद्गुणांच्या पाठीशी उभी ठाकलेली संस्कृतीच! गुडेवारांना नेण्याचे धाडस बहुदा लोकभावनेच्या या भरीव प्रदर्शनानंतर शासन करणारही नाही. परंतु गुडेवार कायम राहिलेच तर त्यांची जबाबदारी पूर्वीच्या तुलनेत कैकपटीने वाढलेली असेल. शहर कायमस्वरुपी आठवणीत ठेवेल, अशी काही 'यादगार' बात गुडेवारांच्या कारकीर्दीत अंबानगरीवासियांसाठी घडल्यास लोकप्रेमाचा तो सन्मान ठरेल!

Web Title: Culture of Thakli standing behind the virtues!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.