विकृती निस्तरण्यासाठी सांस्कृतिक कोंदण हवे !
By Admin | Updated: October 5, 2015 00:38 IST2015-10-05T00:38:14+5:302015-10-05T00:38:14+5:30
'तू माझी झाली नाहीस, तर कुणाचीच नाही, अशी दर्पोक्ती आज प्रेमात केली जाते. ही विकृती कायद्याच्या टाचेखाली चिरडून संपुष्टात येणार नाही, ...

विकृती निस्तरण्यासाठी सांस्कृतिक कोंदण हवे !
उज्ज्वल निकम : स्त्री शक्ती पुरस्काराचे वितरण
अमरावती : 'तू माझी झाली नाहीस, तर कुणाचीच नाही, अशी दर्पोक्ती आज प्रेमात केली जाते. ही विकृती कायद्याच्या टाचेखाली चिरडून संपुष्टात येणार नाही, ती विकृती निस्तरण्यासाठी सांस्कृतिक कोंदण हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले.
राजमाता अहिल्या देवी फाऊंडेशनच्यावतीने रविवारी दुपारी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळा पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते. यावेळी मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल, उद्योजिका उज्ज्वला हावरे, प्रशासकीय अधिकारी संगीता धायगुडे, मेळघाटातील वैरागडच्या समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे तथा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके यांना अहिल्यादेवी 'स्त्री शक्ती' पुरस्काराने गौरविण्यात आले.
टीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या मालिकांवर भाष्य करताना पालकांनी त्यांच्या पाल्यांची काळजी घेण्याचे आवाहन उज्ज्वल निकम यांनी केले. बेछुट गोळीबार करणारी पिढी जरी येथे जन्माला यायची असली तरी माथेफिरु प्रेमविरांची कमी नाही, त्यामुळे तर्काला छेद देणाऱ्या मालिकांपासून या पिढीला वाचविण्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
पैशाची श्रीमंती हे अळवावरचं पाणी तर मनाची श्रीमंती शिंपल्यातले मोत्यासारखी आहे. म्हणूनच मनाची श्रीमंती जपा असे आवाहन निकम यांनी केले. आज ज्या पाच हिरकणींचा येथे सत्कार केला गेला, त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, शिका मी आणि माझा देश, अशी संकल्पना रुजवा. आज असा एकही गँगस्टर नाही, जो मला झुकून सलाम करीत नाही. त्यामुळे मी आज स्वत:ला कायदेक्षेत्रातील डॉन मानतो, यासाठी आत्मविश्वास जागवावा लागतो, अशा शब्दांत निकम यांनी आत्मविश्वासाचे महत्त्व सांगितले. हा पुरस्कार सोहळा भोसले सभागृहात झाला. डॉ. रवींद्र कोल्हे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.