मशागत; पावसाची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 7, 2015 00:27 IST2015-06-07T00:27:24+5:302015-06-07T00:27:24+5:30
यावर्षी कडाक्याचे ऊन तापल्याने व पावसाळा चार दिवसांवर येऊन ठेपल्याने तालुक्यात शेतीची मशागतीच्या ..

मशागत; पावसाची प्रतीक्षा
शेतकरी व्यस्त : बियाण्यांचे नवनवीन वाण बाजारात
चांदूरबाजार : यावर्षी कडाक्याचे ऊन तापल्याने व पावसाळा चार दिवसांवर येऊन ठेपल्याने तालुक्यात शेतीची मशागतीच्या कामांना वेग आला आहे. काही शेतकऱ्यांनी मशागत आटोपली आहे तर काहींची शेवटच्या टप्प्यात असून बियाण्यांचीही तजवीज झाली आहे. आता वाट आहे केवळ पावसाची.
ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी मजुरीचे दर वधारले असून मजूरसुद्धा मिळत नसल्याने बाहेरून आणून अपूर्ण असलेली मशागतीची कामे शेतकरी आटोपत आहेत. यातच बाजारात विक्रीसाठी आलेल्या बियाण्यांच्या नवनवीन वाणांमुळे शेतकरी गोंधळात सापडला आहे. रबीचा हंगाम संपल्यानंतर लगेच शेतीतील मशागतीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
शेतातील फण-पऱ्हाट्या वेचणे आणि जाळणे ही कामेसुद्धा पूर्णत्वास गेली आहे. सतत निसर्गाची साथ शेतकऱ्यांना लाभत नसल्यामुळे यावर्षीही शेतात पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे. रबी हंगामसुद्धा आता संपला असल्याने पुढील पेरणीसाठी तालुक्यातील बळीराजा पुन्हा सज्ज झाला आहे. पावसाळा अगदी चार वर येऊन ठेपला असताना शेती पेरणीयोग्य करण्यास सुरवात झाली आहे. शेतातील काडीकचरा पेटवून शेत स्वच्छ करण्याची युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे.
तालुक्यात जवळपास मशागतीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. आता बी-बियाण्यांसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झालेली आहे. पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी शेतातील कामे हाती घेतले आहे. सकाळी ५ वाजताच शेतीच्या कामाला प्रारंभ होत आहे. दुपारच्या सत्रात कडाक्याच्या उन्हामुळे काम करणे शक्य नसल्याने शेतात पहाटेपासून नांगरणी सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडीची व्यवस्था आहे त्यांनी अंतिम टप्प्यातील मशागत घरीच चालू केली आहे.
दरवर्षी होणाऱ्या नापिकीमुळे व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने यावर्षी शेत लागवणीला देणे जरी जोरात असले तरी येणाऱ्या व्यक्ती संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत लागवणीला यावर्षी कमी भावाने लागवणीवर शेत देण्यास शेतकरी तयार झाला आहे.
ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, अशा शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेतात शेणखत टाकायला सुरुवात केली आहे. तसेच बी-बियाणे खताची खरेदी करून आपल्या गावी गोदामात नेत आहेत. पण आर्थिक परिस्थिती नसणारे शेतकरी आजही कर्जाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)
आंध्रच्या कंपन्यांचा बाजारात बोलबाला
बियाणे बाजारात नवनवीन कंपन्यांनी आपले अस्तित्व सिध्द करण्याचा प्रयत्न चालविला असला तरीही आंध्रप्रदेशातील बियाणे कंपन्यांचा बाजारात बोलबाला सुरु आहे. शेतकऱ्यांची शेतीच्या मशागतीची कामे आटोपली आहे. काही ठिकाणी मशागत अंतिम टप्प्यात आहे. जून महिन्यात जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी यंदा भरघोस पीक घेण्याच्या अपेक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी उसणवार करुन बियाणे खरेदीसाठी लगबग चालविली आहे. ग्रामीण भागातही बियाण्यांबाबत जाहीरातयुध्द सुरु आहे.